जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. त्यामुळे आगामी सुणासुदीसाठी दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला.
जागतिक आर्थिक घडामोडी, अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या यूएस फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणात्मक निर्णयांबाबतची अनिश्चितता आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार यामुळे देशांतर्गत सराफा बाजारात अस्थिरतेचे वातावरण कायम आहे. मंगळवारीही सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली असून, चांदीच्या दरातही लक्षणीय नरमाई दिसून आली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीची योजना करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती तुलनेने कमी होत्या. मात्र, पहिल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बाजारात नफा वसुली, डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे सोन्याच्या किमती नरमल्या आहेत.
दुसरीकडे, चांदीच्या किमतींमध्ये सोन्याच्या तुलनेत अधिक घसरण झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील मागणीतील बदल, जागतिक बाजारातील मंदावलेली खरेदी आणि गुंतवणूकदारांच्या बदलत्या भूमिकेमुळे चांदीवर अधिक दबाव दिसून येत आहे. परिणामी, चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली. दरम्यान, जागतिक बाजाराचे लक्ष आता यूएस फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्यात झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताकडे लागले आहे. हे इतिवृत्त ८ जुलै रोजी जाहीर होणार असून, त्यातून अमेरिकेतील व्याजदर धोरणाबाबत महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. महागाई अजूनही फेडच्या दोन टक्के लक्ष्यापेक्षा अधिक असल्याने यावर्षी किमान एकदा व्याजदरात वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
मौल्यवान धातूंवर आणखी दबाव शक्य
जून महिन्यात अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आणि अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने बाजारात यंदा तीन वेळा व्याजदर वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, त्यानंतर जाहीर झालेली अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिल्याने आक्रमक व्याजदर वाढीच्या शक्यता काहीशा कमी झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक सावध भूमिका घेत असून, फेडच्या पुढील संकेतांवर त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, फेडच्या बैठकीच्या इतिवृत्तातून व्याजदरांबाबत स्पष्ट संकेत मिळाल्यास त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर होऊ शकतो. व्याजदर वाढीचे संकेत मिळाल्यास डॉलर मजबूत होऊन मौल्यवान धातूंवर दबाव येण्याची शक्यता आहे. उलट व्याज दरवाढीबाबत मवाळ भूमिका दिसल्यास सोन्याला पुन्हा आधार मिळू शकतो.
सोन्याचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दिवसभरात १३३९ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,७६२ रुपयांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ७२१ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४९,०४१ रुपयांपर्यंत घसरले. त्यामुळे सोन्याच्या दरात दोन दिवसांत २०६० रुपयांची घट झाल्याची नोंद घेतली गेली.
चांदीचे दर किती कमी झाले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोमवारी दिवसभरात १०३० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४३,०८० रुपयांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ३०९० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३९,९९० रुपयांपर्यंत घसरली. त्यामुळे चांदीच्या दरात दोन दिवसांत ४१२० रुपयांची घट झाल्याची नोंद घेतली गेली.
