जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत फेब्रुवारीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दिवसभरात सोने आणि चांदीने मोठी झेप घेतली. दोन्ही धातुंच्या दरात अचानक दरवाढ झाल्याने ग्राहकांना धक्का बसला. दरवाढीमुळे दागिन्यांच्या विक्रीवर परिणाम झाल्याने सुवर्ण व्यावसायिकांनी देखील डोक्याला हात लावला.
जागतिक भू-राजकीय तणाव, अमेरिकन डॉलरमधील घसरण आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला ओढा यामुळे शनिवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी विक्रमी झेप घेतली. देशांतर्गत बाजारातील दिवसभराच्या व्यवहारात सोन्याच्या किमतींनी प्रति १० ग्रॅम १,७५,००० रुपयांचा टप्पा ओलांडला, तर चांदीने प्रति किलो तीन लाख रुपयांची पातळी पार केली. अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. डॉलर कमजोर झाल्यास इतर चलन धारकांसाठी सोने तुलनेने स्वस्त ठरते, त्यामुळे जागतिक स्तरावर खरेदी वाढते. याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण दरम्यान अलीकडे झालेल्या चर्चांचा कोणताही ठोस निष्कर्ष निघालेला नाही. मध्यस्थी करणाऱ्या ओमानने काही प्रमाणात प्रगती सूचित केली असली तरी, परिस्थिती अद्याप अनिश्चितच आहे.
देशांतर्गत मागणीचाही परिणाम
भारतीय बाजारात लग्नसराई आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीची मागणी वाढलेली आहे. ग्रामीण भागात चांगल्या पिकामुळे खरेदी क्षमता वाढली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या असतानाही देशांतर्गत मागणीमुळे दरांना अधिक आधार मिळत आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, सध्या गुंतवणूकदार ‘सेफ हेवन’ म्हणून सोने खरेदी करत आहेत. शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य दिले जात आहे. जर मध्यपूर्वेतील तणाव कायम राहिला आणि डॉलरमध्ये आणखी घसरण झाली, तर सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर शांततेचा मार्ग निघाल्यास किंवा अमेरिकन अर्थव्यवस्थेतील सकारात्मक संकेत मिळाल्यास दरांमध्ये काही प्रमाणात स्थिरता येऊ शकते.
सोन्याचे दर किती वाढले?
जळगाव शहातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी ११३३ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ४६१ रुपयांपर्यंत खाली आले होते. तर शुक्रवारी ४१२ रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ८७३ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, शनिवारी दिवसभरात आणखी तब्बल १२ हजार ०५१ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७५ हजार ९२४ रुपयांपर्यंत वधारले.
चांदीचे दर किती वाढले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी ८२४० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७२ हजार ९५० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर शुक्रवारी ७२१० रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८० हजार १६० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, शनिवारी दिवसभरात आणखी तब्बल २३ हजार ६९० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो तीन लाख तीन हजार ८५० रुपयांपर्यंत वधारले.
