जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने, चांदीचे दर वाढल होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दोन्ही धातुंचे दर गडगडल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. जागतिक आर्थिक घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील बदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या स्थितीचा थेट परिणाम देशांतर्गत सोन्याच्या दरांवर झाला आहे.

भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच किमतींमध्ये मोठी अस्थिरता दिसून येत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये मंगळवारी सोमवारच्या तुलनेत सोन्याचे दर कमी झाले. ही घसरण जरी मोठी नसली तरी सतत बदलणाऱ्या ट्रेंडमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांमध्येही सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम जवळ येत असताना सोन्याच्या किंमतीतील ही नरमाई खरेदीदारांसाठी काही प्रमाणात दिलासा देणारी ठरली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सध्या सोन्यावर दबाव कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. जाणकारांच्या मते, सध्या जागतिक स्तरावर सोन्याचा दर प्रति औंस सुमारे ४,६३० डॉलरच्या आसपास आहे. डॉलर मजबूत होत असल्याने आणि प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढण्याची शक्यता असल्याने सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीच्या साधनांची मागणी काहीशी कमी होत आहे. परिणामी, सोन्याच्या किमतींमध्ये घट होताना दिसत आहे.

सध्याच्या परिस्थितीत केवळ सोनेच नव्हे तर चांदी, बेस मेटल्स आणि कच्च्या तेलाच्या बाजारातही स्थिर किंवा मर्यादित हालचाली दिसू शकतात. बाजाराची दिशा मोठ्या प्रमाणावर जागतिक भू-राजकीय तणाव, आर्थिक धोरणे आणि मध्यवर्ती बँकांच्या निर्णयांवर अवलंबून राहणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हा काळ मिश्र संकेत देणारा आहे. अल्पकालीन घसरण खरेदीची संधी देऊ शकते, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीपूर्वी बाजारातील ट्रेंड, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आर्थिक निर्देशक यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचा सल्ला आहे की, अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे आणि जोखीम व्यवस्थापनावर भर देणे अधिक सुरक्षित ठरू शकते. एकूणच, सोन्याच्या दरातील सध्याची घसरण ही तात्पुरती असू शकते, परंतु जागतिक घटकांचा प्रभाव कायम राहिल्याने पुढील काळात किमतींमध्ये चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राहक आणि गुंतवणूकदारांनी सतर्क राहून योग्य वेळी निर्णय घेणे गरजेचे आहे.

सोन्याचे दर किती कमी झाले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,७७९ रुपयांवर स्थिरावले होते. तर सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी २०६ रुपयांची किंचित वाढ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५३,९८५ रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर १३०९ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,६७६ रुपयांपर्यंत खाली आले.

चांदीचे दर किती कमी झाले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४५,१४० रुपयांवर स्थिरावले होते. तर सोमवारी ३०९० रुपयांची वाढ झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,४८,२३० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३०९० घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,४५, १४० रुपयांपर्यंत खाली आले.