जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदविण्यात आली. दोन्ही धातूंच्या दरातील घसरण पाहून दागिने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांमध्ये उत्साह संचारला. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळ बऱ्यापैकी वाढल्याचे दिसून आले. 

आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. सोमवारी झालेल्या जोरदार घसरणीनंतर मंगळवारी सोन्याच्या दरात किरकोळ सुधारणा झाली. स्पॉट सोन्याचा दर सुमारे ०.२ टक्क्यांनी वाढून ४,१२६.५२ डॉलर प्रति औंसवर पोहोचला. मात्र, त्याआधी सोमवारी सोन्याच्या दरात जवळपास ४ टक्क्यांची घसरण होऊन भाव सात आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. चांदीच्या दरातही मोठी अस्थिरता दिसून आली. सोमवारी सुमारे ६ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर मंगळवारी चांदीचा दर ०.२ टक्क्यांनी वाढून ६०.७७ डॉलर प्रति औंसवर पोहचला.

तज्ज्ञांच्या मते, मौल्यवान धातूंच्या दरातील या घसरणीमागे अनेक जागतिक घटक कारणीभूत आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव तसेच होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या परिस्थितीमुळे जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

महागाईचा दबाव कायम राहिल्यास अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह व्याजदर कमी करण्याऐवजी ते उच्च पातळीवर कायम ठेवू शकते किंवा आणखी वाढ करू शकते, अशी बाजाराची अपेक्षा आहे. दरम्यान, अमेरिकन ट्रेझरी बॉण्डवरील यील्डमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. वाढते बॉण्ड यील्ड आणि मजबूत डॉलर यामुळे व्याज किंवा नियमित उत्पन्न न देणाऱ्या सोन्याचे आकर्षण तुलनेने कमी होते. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून सोन्यातील नफा वसूली आणि विक्रीचा दबाव वाढला आहे.

सप्टेंबरमध्ये सोन्याच्या किमतीत झालेली घसरण ही याच व्यापक बाजारातील बदलांचे प्रतिबिंब मानली जात आहे. देशांतर्गत बाजारावरही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाला आहे. दरम्यान, दोन्ही धातूंचे दर दिवसभरात बदलू शकतात. 

सोने नेमके किती घसरले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिवसभरात ३०९० रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १५२,९५५ रुपयांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी १३५४ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५१,९१० रुपयांपर्यंत घसरले. सोन्यात गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत ५१६५ रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेण्यात आली. 

चांदी नेमकी किती घसरली?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी दिवसभरात ७२१० रुपयांची घट झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,३२,७८० रुपयांपर्यंत खाली आली होती. मंगळवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी २०६० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३०,७२० रुपयांपर्यंत घसरली. चांदीत गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ११,३३० रुपयांची घसरण झाल्याची नोंद घेण्यात आली.