जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी देखील दोन्ही धातुंच्या दरात घट नोंदविण्यात आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. जागतिक आर्थिक घडामोडी, अमेरिकेतील व्याज दरवाढीची शक्यता आणि मजबूत होत असलेला डॉलर यांचा परिणाम सध्या मौल्यवान धातूंच्या बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदविण्यात आली आहे. या घसरणीमुळे आधीपासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली असली, तरी नवीन गुंतवणूकदारांसाठी ही एक संभाव्य संधी मानली जात आहे. अमेरिकेन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढविले जाण्याची शक्यता वाढत असल्याने गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यापासून दूर जात आहेत. व्याजदर वाढल्यास बाँड्स आणि इतर निश्चित परतावा देणाऱ्या साधनांमधून अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे सोने, जे कोणतेही नियमित व्याज किंवा लाभांश देत नाही, ते तुलनेने कमी आकर्षक ठरते. यामुळेच सोन्याच्या मागणीत घट झाल्याचे बोलले जात आहे.

दर घसरण्याचे हे कारण

याशिवाय अमेरिकन ट्रेझरी बाँड्सवरील उत्पन्न वाढल्याने आणि डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या दरांमध्ये आणखी घसरण झाली आहे. डॉलर मजबूत झाल्यास इतर देशांतील खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग होते, ज्यामुळे जागतिक मागणी कमी होण्याची शक्यता वाढते. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या घसरणीमागे हा एक प्रमुख घटक आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावाचाही बाजारावर परिणाम दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक आर्थिक वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. सामान्यतः अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते; मात्र सध्या गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या आर्थिक धोरणांकडे अधिक केंद्रित असल्यामुळे या तणावाचा सोन्याला अपेक्षित आधार मिळताना दिसत नाही. चांदीच्या किमतींवरही याच घटकांचा प्रभाव पडला असून, औद्योगिक मागणीबाबतची चिंता आणि जागतिक आर्थिक मंदीची भीती यामुळे चांदीतही कमजोरी दिसून आली आहे. परिणामी, सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंच्या दरावर दबाव कायम आहे.

सोने नेमके किती घसरले?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी १२३६ रुपयांची घट झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,५६० रुपयांपर्यंत खाली आले होते. सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी १३३९ रुपयांची घट झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५५,२२१ रुपयांपर्यंत घसरले.

चांदी नेमकी किती घसरली?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत शनिवारी तब्बल ११,३३० रुपयांची घट झाल्याने चांदी तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५९,५६० रुपयांपर्यंत खाली आली होती. सोमवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ६१८० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,५३,३८० रुपयांपर्यंत घसरली.