जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले सोने, चांदीच्या दरातील चढ-उतार अखेर शनिवारी थांबले. दोन्ही धातुंचे दर एकदाचे स्थिरावल्याने ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरचे मूल्य आणि कच्च्या तेलाच्या दरातील वाढ या प्रमुख कारणांमुळे मौल्यवान धातुंवरील दबाव वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरु होते. मात्र, आता बाजारात दर घसरणीचा कल दिसून येत आहे. सुरुवातीला जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर वळण घेतले होते. विशेषतः मध्यपूर्वेतील संघर्ष, इस्रायल–इराण तणाव आणि संभाव्य युद्धस्थितीमुळे सोन्याच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. मात्र, परिस्थिती जसजशी बदलू लागली, तसतसे गुंतवणूकदारांचे धोरणही बदलताना दिसत आहे.

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात पुढील दोन ते तीन आठवड्यांत मोठी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर जागतिक बाजारपेठेत पुन्हा अस्थिरता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. तेल दरवाढीमुळे महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय, गुंतवणूकदारांनी सोन्याऐवजी इतर गुंतवणुकीचे पर्याय जसे की शेअर बाजार, बाँड्स किंवा इतर वित्तीय साधनांकडे वळण्यास सुरुवात केल्याचेही चित्र आहे. यामुळे सोन्याची मागणी कमी होत असून, चांदीच्या किमतींमध्येही याच कारणांमुळे अस्थिरता कायम आहे. दरम्यान, इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संघर्षाचा तातडीने तोडगा निघण्याची शक्यता कमी असल्याने जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर काहींच्या मते घसरणीचा कलही सुरू राहू शकतो. एकूणच, सध्या सोने-चांदी बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असून, गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगून निर्णय घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

सोन्याचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी २१६३ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५३ हजार ७७९ रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, शुक्रवारी कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने सोन्याचे दर स्थिर राहिले. शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावरही सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ५३ हजार ७७९ रुपयांवर स्थिर राहिले. सलग दोन दिवस सोन्याचे दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला.

चांदीचे दर आता किती?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी ६१८० रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४७ हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर शुक्रवारी दिवसभरात आणखी २०६० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४५ हजार १४० रुपयांपर्यंत खाली आले होते. शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर मात्र दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. त्यामुळे चांदीचे दर स्थिर राहिले.