जळगाव : जिल्ह्यात पावसाळा सुरु असतानाच भूजल पातळीत लक्षणीय घट झाल्याने आगामी काळात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत अपेक्षित पावसाच्या तुलनेत यंदा २३ टक्के तूट राहिल्याने भूजल पुनर्भरणावर परिणाम झाला आहे. परिणामी, विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत असून, पावसाळा संपण्यापूर्वीच अनेक भागांत पाणी पातळी चिंताजनक स्थितीत पोहचली आहे.
भूजल सर्वेक्षण विभागाने मागील पाच वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी यंदाच्या सप्टेंबरअखेरच्या स्थितीची तुलना केली असता जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये भूजल पातळी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. विभागाने १६६ विहिरींचे निरीक्षण करून हा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, भूजल बोदवड तालुक्यात तब्बल २.९१ मीटरने भूजल पातळी खाली गेली आहे. त्यामुळे या भागातील विहिरी आणि कूपनलिकांवर अवलंबून गावांचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
याशिवाय मुक्ताईनगरमध्ये १.८८ मीटर, यावलमध्ये १.८६ मीटर, जामनेरमध्ये १.८१ मीटर आणि जळगाव तालुक्यात १.६३ मीटरने भूजल पातळी घटली आहे. चोपडा तालुक्यात १.३५ मीटर, चाळीसगावमध्ये १.२८ मीटर, भडगावमध्ये १.२४ मीटर आणि एरंडोलमध्ये १.१७ मीटरने घट नोंदविण्यात आली आहे. अमळनेरमध्ये १.१२ मीटर, पारोळ्यात १.०८ मीटर, भुसावळमध्ये १.०६ मीटर, धरणगावमध्ये ०.९९ मीटर, पाचोऱ्यात ०.८५ मीटर आणि रावेरमध्ये ०.७८ मीटरने भूजल पातळी खालावली आहे.
बागायती पट्ट्याला मोठा फटका
सामान्यतः पावसाळ्यात पर्जन्य जल जमिनीत मुरल्याने विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ अपेक्षित असते. मात्र, यंदा पावसाचे वितरण असमान राहिल्याने आणि पावसामध्ये दीर्घ खंड पडल्याने भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया अपेक्षित प्रमाणात झाली नाही. त्यामुळे पावसाळ्यातच भूजल पातळी खालावल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका भूजलावर अवलंबून असलेल्या बागायती पट्ट्यांवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रावेरसह यावल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव आणि भडगाव या भागांत केळी, लिंबू आणि अन्य फळपिकांचे क्षेत्र मोठे आहे. या पिकांना नियमित सिंचनाची आवश्यकता असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी कमी होणे संबंधित शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण ठरणार आहे.
पुढील आठ महिने निर्णायक
दरम्यान, पावसाळा संपेपर्यंतच भूजल पातळीत एवढी घट झाल्याने पुढील आठ महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर भूजलाचे नैसर्गिक पुनर्भरण कमी होतो, तर शेतीसाठी पाण्याचा उपसा वाढतो. त्यामुळे उपलब्ध भूजलसाठ्यावर वाढता ताण येण्याची शक्यता आहे. गिरणा आणि तापी नदीत धरणांमधून वेळोवेळी आवर्तने सोडण्यात आली असली तरी नदीकाठच्या भागातील भूजल पातळीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. नदीपात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे पाण्याचे जमिनीत झिरपणे कमी झाल्याचा परिणाम भूजल पुनर्भरणावर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नदीत पाणी असतानाही लगतच्या विहिरी आणि कूपनलिकांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
तलावही आटण्याच्या मार्गावर
जिल्ह्यातील लहान-मोठ्या तलावांमधील पाणी साठाही कमी होत आहे. परतीचा पाऊस न झाल्यास ही परिस्थिती अधिक तीव्र होऊ शकते. भूजल पातळी कमी होत असताना शेतीसाठी पाण्याची गरज कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी आणि कूपनलिकांमधून अधिक खोलवरून पाणी उपसावे लागत आहे. विजेचा पुरवठा अनियमित असल्याने उपलब्ध पाण्याचा उपसाही अडचणीचा ठरत आहे. परिणामी, घटता भूजलसाठा आणि वाढती सिंचनाची गरज यांच्यातील तफावत आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
