जळगाव : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ या संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या महाविद्यालयांमध्ये तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नशिराबाद येथील लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे याच्याविरुद्ध औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) पोलीस ठाण्यात फसवणूक, विश्वासघात आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत संशयित लोकेश उर्फ चेतन कोल्हे याने त्यांच्या शैक्षणिक संस्थेतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित कामकाज सांभाळताना विश्वासाचे संबंध निर्माण केले. याच विश्वासाचा नंतर गैरफायदा घेत त्याने विविध आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेच्या अखत्यारितील विविध महाविद्यालयांमधील निधीचा अपहार करून एकूण ४,८५,०३,५८२ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. शैक्षणिक संस्थेच्या आर्थिक नोंदी, बँक व्यवहार आणि विविध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक तफावत आढळून आली. यानंतर माजी मंत्री देवकर यांनी पोलिसांकडे मंगळवारी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी आणि प्राथमिक चौकशीनंतर औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०९ (विश्वासात दिलेल्या मालमत्तेचा अपहार), ४६८ (फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्र तयार करणे) आणि ४७१ (बनावट कागदपत्राचा वापर करणे) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या आर्थिक गैरव्यवहारामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या तपासाची सूत्रे हाताळत असून आर्थिक व्यवहारासह बँक खात्यांमधील देवाणघेवाण, लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात येणार आहे. कोल्हे याच्याकडून करण्यात आलेल्या अपहाराची रक्कम जवळपास पाच कोटी रुपयांच्या घरात असल्याने हे प्रकरण जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांपैकी एक मानले जात आहे. तपासादरम्यान आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संशयित लोकेश उर्फ चेतन कोल्हे याला पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आलेली नाही.