जळगाव : अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता आणखी एक गंभीर संकट उभे ठाकले आहे. सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून राहिल्याने कपाशीवर मुळ कुजव्या (रूट रॉट) रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून अनेक ठिकाणी हिरवीगार दिसणारी झाडे अचानक कोमेजून वाळत आहेत. त्यामुळे पुराच्या तडाख्यातून वाचलेले पीकही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशीचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून असल्याने पिकांची वाढ खुंटली असून आता त्याच पाण्यामुळे मुळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे उभी कपाशीची झाडे मोठ्या प्रमाणात वाळू लागल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे.

आधीच कपाशीच्या क्षेत्रात मोठी घट

यंदा जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी कपाशीच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे सव्वालाख हेक्टरने कपाशीचे क्षेत्र कमी झाले असताना उरलेल्या पिकावरही रोगाचे संकट आल्याने आगामी काळात कापूस उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

देशी, अमेरिकन वाणांना फटका

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राच्या माहितीनुसार, मुळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव देशी तसेच अमेरिकन अशा दोन्ही प्रकारच्या कपाशीवर प्रामुख्याने होतो. लहान रोपांपासून ते पूर्ण वाढ झालेल्या झाडांपर्यंत कोणतेही पीक या रोगाला बळी पडू शकते. जमिनीत दीर्घकाळ पाणी साचल्याने रोगास कारणीभूत असलेल्या बुरशीची वाढ वेगाने होते आणि ती पावसाच्या किंवा सिंचनाच्या पाण्याद्वारे शेतभर पसरते. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कपाशीची झाडे अचानक कोमेजून वाळू लागतात. झाड सहजपणे जमिनीतून उपटले जाते. मुळे पूर्णपणे कुजलेली दिसतात, त्यावरील साल सहज निघते आणि ती तंतुमय झालेली असते. मुळाचा खालचा भाग सुरुवातीला पिवळसर पडतो, त्यानंतर काळपट होतो. झाडाच्या सालीच्या आतील भागात काळ्या रंगाची गोलाकार बुरशीची बीजे दिसून येतात. ही लक्षणे दिसताच तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

उत्पादनावर परिणाम होण्याची भीती

अतिवृष्टी, पूर आणि त्यानंतर वाढलेला मुळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे यंदाच्या हंगामातील कापूस उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत रोगाची लक्षणे ओळखून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार उपाययोजना केल्यास नुकसान काही प्रमाणात कमी करता येईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढून निचऱ्याची व्यवस्था करावी. पाण्याचा ताण आणि जास्त तापमान असल्यास संरक्षित सिंचन द्यावे. १०० लिटर पाण्यात ७०० ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड मिसळून झाडांच्या बुंध्याजवळ आळवणी (ड्रेचिंग) करावी. तसेच शक्य असल्यास कोळपणी करून झाडांना मातीची भर द्यावी, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जळगाव येथील कापूस संशोधन केंद्राने दिला आहे.