जळगाव : जिल्ह्यात ३० आणि ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५० हजार १९९ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांची हानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका १५ तालुक्यांतील ५७८ गावांमधील ७८ हजार ५३२ शेतकऱ्यांना बसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला. शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके जलमय झाली, तर अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे आडवी पडून वाहून गेली. शेतातील बांध, सिंचन व्यवस्था आणि मृदासुद्धा मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
कपाशीचे सर्वाधिक नुकसान
प्राथमिक नोंदीनुसार जळगाव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक ३५ हजार ११९ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. याशिवाय ११ हजार ९५ हेक्टरवरील मका, ८५५ हेक्टरवरील मूग, २७५ हेक्टरवरील उडीद, ५४२ हेक्टरवरील तूर, १३१ हेक्टरवरील बाजरी, ८२६ हेक्टरवरील सोयाबीन, ९३ हेक्टरवरील ज्वारी, ३१ हेक्टरवरील भाजीपाला, ६१८ हेक्टरवरील केळी तसेच ३२६ हेक्टरवरील इतर फळपिके व नगदी पिकांचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. कृषी विभागाकडून महसूल प्रशासनाच्या सहकार्याने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी सुरू असून, अंतिम पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमळनेर तालुका सर्वाधिक बाधित
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याला अतिवृष्टीसह पुरस्थितीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या तालुक्यात ३० हजार ९४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, १५५ गावांतील ४९ हजार ४३३ शेतकरी बाधित झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतांमध्ये गाळ साचल्याने काही भागांत शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. पंचनाम्यांच्या दीर्घ प्रक्रियेत वेळ न दवडता सरसकट हेक्टरी आर्थिक मदत आणि पीकविमा दाव्यांचे त्वरित वितरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, सलग नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक कोंडी वाढली असून नव्याने पेरणी किंवा पीक उभे करण्यासाठी तातडीच्या मदतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून विशेष आर्थिक पॅकेज मंजूर करून घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अंतिम अहवालानंतर मदतीचा प्रस्ताव
जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील पाहणी सुरू ठेवली असून कृषी व महसूल विभागाचे अधिकारी संयुक्तपणे पंचनामे करणार आहेत. अंतिम अहवाल शासनाकडे सादर केल्यानंतर मदत प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने प्रशासनाने शेतकरी व नागरिकांना पुन्हा सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
