जळगाव : उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तिपत्र देत सत्कार झालेला जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस ठाण्यातील हवालदार ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. तक्रारदार हे भडगाव येथील रहिवासी असून, त्यांना भडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत हवालदार किरण पाटील (४१) यांनी २५ जुलै रोजी तक्रारदाराकडे दोन गुन्हे दाखल असताना, सुरळीत वाळू वाहतूक करण्यासाठी, तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी दोन लाख ६० हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने गुरुवारी पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. त्यात हवालदार पाटीलने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पथकाने भडगाव पोलीस ठाणे आवारात सापळा रचला. त्यावेळी तक्रारदारांकडून हवालदार पाटीलने दोन लाख ६० हजार रुपयांची मागणी करून त्यातील पहिला हप्ता म्हणून तडजोडीअंती पंचांसमक्ष ५० हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…नाशिक जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक शाळाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात
दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हवालदार किरण पाटील यांचा गुरुवारी प्रशस्तिपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळालेल्या तक्रारीनुसार हवालदार पाटील यांच्यावर लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याच्या कारवाईने जिल्हा पोलीस दलातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
© The Indian Express (P) Ltd