जळगाव : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा १६ ते १८ कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित केल्या आहेत. या स्पर्धांची जय्यत तयारी करण्यात आली असून, सुमारे तीन हजार खेळाडू विविध क्रीडा प्रकारांत सहभागी होऊन त्यांची कौशल्ये दाखवणार आहेत.

आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सकाळी १०.३० वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उइके यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनप्रसंगी केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

स्पर्धांचा समारोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बुधवारी दुपारी तीन वाजता आयोजित केला असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोडे राहतील. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडुंना गौरविण्यात येणार आहे.

विभागीय स्पर्धांमध्ये नाशिक महसूल विभागातील जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थी खेळाडू सहभागी होणार आहेत. मैदानी व मैदानी बाह्य अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू आपले कौशल्य सादर करणार असून, या स्पर्धांमधून निवड झालेल्या खेळाडुंना पुढे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहेत. त्या दृष्टीने क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांतही जिंकण्याची उर्मी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रशिक्षकांकडून क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी खेळाडुंना सर्व प्रकारच्या खेळांचे योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयक जाणीव निर्माण करण्यासह संघ भावना, शिस्त व कार्यक्षमता वाढवणे, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देणे, हा विभागीय क्रीडा स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे, असे आयोजकांनी सांगितले. स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यापीठ प्रशासन तसेच विविध समित्या परिश्रम घेत असून, जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडुंनी काही दिवसांपासून सरावावर भर दिला आहे.