जळगाव : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पदभार घेतल्यानंतर लगेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला थेट ट्रॅक्टरखाली ओढून जीव मारण्याचा प्रयत्न चोपडा तालुक्यात झाला होता. त्यानंतर आता अमळनेर तालुक्यात कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला करून गावठी बंदुकीने धमकावण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यात विविध कारणांमुळे वाळू ठेक्यांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असताना, या परिस्थितीचा गैरफायदा घेत वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर हैदोस घातल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलीस आणि महसूल विभागाकडून अधूनमधून कारवाई होत असली तरी वाळू तस्करीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे गिरणा, तापी, बोरी, पांझरा आणि इतर बऱ्याच नद्यांमधील अवैध वाळू उपसा बिनबोभाटपणे सुरूच आहे. संबंधितांना रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकांवर हल्ला करण्यापर्यंत माफियांची मजल गेली आहे. पोलिसांचाही कोणताच धाक संबंधितांना राहिलेला नाही.
अमळनेर तालुक्यातील मांडळ शिवारात पांझरा नदीच्या पात्रात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावरही रविवारी माफियांनी हल्ला केल्याची घटना घडली. अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील, ग्राममहसूल अधिकारी संदीप माळी, जितेंद्र पाटील, मधुकर पाटील, पवनकुमार शिंगारे आणि दीपक पाटील यांचे पथक पांझरा नदीच्या काठी पोहोचले. त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये वाळू भरली जात असल्याचे महसूल पथकाच्या पाहण्यात आले. त्यांनी चालकांकडे परवान्याची विचारणा करून वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले.
या दरम्यान, अचानक पाच ते सहा जण दुचाकीवरून आले आणि त्यांनी महसूल विभागाच्या पथकाला धमकावले. त्यांच्यात नंतर दहा-बारा जण लाठ्या-काठ्यांसह सामील झाले. हल्लेखोरांनी आधी महसूल अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. एका संशयिताने महसूल अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या डोळ्यात मिरचीची स्प्रे मारला, तर दुसऱ्याने त्यांच्या पायावर काठीचा प्रहार केला. आणखी एका हल्लेखोराने मंडळाधिकारी पुरुषोत्तम पाटील यांच्या कपाळावर गावठी बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली.
हल्ल्यानंतर सर्व वाळू माफियांनी एकत्र येत दोन्ही ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी पुरुषोत्तम पाटील यांनी मारवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
