जळगाव : शहरातून इंदूरमार्गे दिल्लीसाठी सुरु होणारी अलायन्स एअर कंपनीची बहुप्रतीक्षित विमानसेवा ऐनवेळी तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्यची माहिती मिळत असून, किमान तीन आठवड्यांनंतरच ती सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन मेपासून या सेवेला प्रारंभ होणार असल्याची अधिकृत घोषणा यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, नियोजित उड्डाणापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणी उड्डाणात विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्याने कंपनीने सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
या विमानसेवेअंतर्गत जळगाव-इंदूर-दिल्ली असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. आठवड्यातील मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीहून दुपारी ४.५० वाजता उड्डाण करणारे विमान इंदूर येथे सुमारे २५ मिनिटे थांबून रात्री ७.५५ वाजता जळगाव येथे दाखल होणार होते. त्यानंतर जळगावहून रात्री ८.२० वाजता उड्डाण घेऊन तेच विमान इंदूरमार्गे दिल्लीला रात्री ११.२० वाजता पोहोचणार होते. या सेवेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट राजधानीशी हवाई जोडणी मिळणार असल्याने व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी तसेच शासकीय कामकाजासाठी प्रवास करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
तिकीट बुकिंग तात्पुरते बंद
दरम्यान, गेल्या आठवड्यात कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या मार्गासाठी तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले होते. त्यानुसार, अनेक प्रवाशांनी २ मे रोजीच्या उद्घाटन उड्डाणासाठी आगाऊ नोंदणी केली होती. मात्र, अचानक सेवा पुढे ढकलल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने सर्व प्रवाशांना ई-मेलद्वारे उड्डाण रद्द झाल्याची माहिती दिल्याचे सांगितले जात असून, त्यांच्या बुकिंग संदर्भात पुढील पर्याय देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
सध्या कंपनीने या मार्गासाठी पुढील तीन आठवड्यांपर्यंत सर्व बुकिंग तात्पुरते बंद केले आहे. विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर किमान एक आठवडा आधी तिकीट बुकिंग पुन्हा सुरू करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या मार्गासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एअरक्राफ्टची अभियांत्रिकी विभागाकडून सखोल तपासणी करण्यात येत असून, इंजिनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
आणखी काही दिवस प्रतीक्षा सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता प्रवाशांच्या जीवितास प्राधान्य देत कंपनीने हा निर्णय घेतल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तथापि, या विलंबामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिल्लीसाठी थेट विमानसेवा मिळण्यास आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विशेषतः व्यापार, वैद्यकीय उपचार, शैक्षणिक कारणांसह प्रशासकीय कामांसाठी नियमित प्रवास करणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. जळगाव विमानतळावरून दिल्लीसाठी नियमित विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या पार्श्वभूमीवर अलायन्स एअरची ही सेवा सुरू होणार असल्याने मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे पुन्हा एकदा प्रतीक्षेचा कालावधी वाढला असून, सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
