जळगाव : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘डी प्लस’ दर्जाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पात्र उद्योगांना आता स्थिर भांडवली गुंतवणुकीसाठी औद्योगिक प्रोत्साहन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, जिल्ह्यात नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार आणि औद्योगिक गुंतवणुकीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

औद्योगिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्यासाठी आणि इतर विकसित औद्योगिक क्षेत्रांच्या तुलनेत जिल्ह्यातील उद्योजकांना स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे यांसारख्या भागांप्रमाणे औद्योगिक प्रोत्साहनांचे लाभ मिळण्याची संधी आता जळगावमधील पात्र उद्योगांना उपलब्ध होणार आहे.

गुंतवणुकीवर इतके प्रोत्साहन

शासन निर्णयातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे पात्र उद्योगांसाठी भांडवली गुंतवणुकीवरील प्रोत्साहनाची वाढलेली मर्यादा. यापूर्वी ‘ड’ वर्गवारीतील पात्र उद्योगांसाठी स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या कमाल ६० टक्के, तर ‘ड प्लस’ वर्गवारीतील उद्योगांसाठी ७० टक्क्यांपर्यंत प्रोत्साहनाची मर्यादा होती. आता जळगाव जिल्ह्यातील पात्र उद्योगांसाठी ही कमाल मर्यादा ८० टक्क्यांपर्यंत करण्यात आली आहे. या प्रोत्साहनाचा कालावधी १० वर्षांपर्यंत असणार आहे. यामुळे नवीन उद्योग उभारण्यासाठी मोठी भांडवली गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळू शकतो. विशेषतः उत्पादन क्षेत्रातील उद्योगांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष लाभ उद्योगाची पात्रता, गुंतवणुकीचे स्वरूप आणि शासनाने निश्चित केलेल्या अटींवर अवलंबून राहणार आहे.

एसजीएसटी आधारित प्रोत्साहन अनुदान

पात्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी राज्य वस्तू व सेवा करावर आधारित औद्योगिक प्रोत्साहन अनुदानाचीही तरतूद आहे. महाराष्ट्रात विक्री केलेल्या तसेच राज्यात बिलिंग आणि वितरण झालेल्या पात्र उत्पादनांच्या पहिल्या विक्रीवरील एकूण एसजीएसटीच्या १०० टक्के रकमेपर्यंत औद्योगिक प्रोत्साहन अनुदान मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना चालना मिळण्याबरोबरच राज्यांतर्गत बाजारपेठेत उद्योगांची स्पर्धात्मक क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. लहान आणि मध्यम उद्योजकांसाठी ही तरतूद विशेष महत्त्वाची ठरणार आहे.

महिला, अपंग उद्योजकांसाठी विशेष संधी

औद्योगिक क्षेत्रात सर्वसमावेशक सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महिला उद्योजक, अनुसूचित जाती-जमातीतील उद्योजक आणि अपंग व्यक्तींच्या मालकीच्या उद्योगांसाठी विशेष श्रेणीतील तरतुदी करण्यात आल्या आहेत. संबंधित उद्योगांनी मालकी हक्क, पात्रता आणि रोजगारविषयक अटींची पूर्तता केल्यास त्यांना धोरणातील विशेष सवलतींचा लाभ घेता येणार आहे. या तरतुदींमुळे महिला आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय किंवा उत्पादन प्रकल्प सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो.

या सुविधांचा समावेश

या औद्योगिक प्रोत्साहन धोरणाचा लाभ केवळ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपुरता मर्यादित नसून, पात्रतेनुसार मोठे, विशेष मोठे, विशाल आणि अतिविशाल उद्योग घटकांनाही विविध सवलती मिळू शकणार आहेत. त्यामुळे मोठ्या कंपन्यांकडून जळगाव जिल्ह्यात गुंतवणूक करण्याच्या शक्यता वाढू शकतात. उद्योगांचे क्षेत्र, गुंतवणुकीचे प्रमाण, रोजगारनिर्मिती आणि संबंधित श्रेणीनुसार प्रोत्साहनांचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. यामध्ये मुद्रांक शुल्क माफी किंवा परतावा, वीज शुल्कातील सवलत, वीजदर अनुदान आणि रोजगार संलग्न अनुदान अशा विविध सुविधांचा समावेश आहे.

नवीन उद्योगांसह विस्तार

जिल्ह्यात नवीन उद्योग सुरू करु इच्छिणाऱ्या उद्योजकांबरोबरच सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांना विस्तार किंवा विविधीकरणासाठीही या धोरणाचा लाभ घेता येणार आहे. विद्यमान कारखान्यांची उत्पादन क्षमता वाढविणे, नवीन उत्पादनांची निर्मिती सुरू करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगांचा विकास करणे यासाठी प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा आहे. यामुळे जळगावमधील औद्योगिक वसाहतींमध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होऊ शकते. स्थानिक पातळीवर पूरक व्यवसाय, वाहतूक, पुरवठा साखळी आणि सेवा क्षेत्राचाही विस्तार होण्याची शक्यता आहे.

रोजगार निर्मितीला मिळणार बळ

जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणेसह मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर किंवा इतर महानगरांकडे स्थलांतर करावे लागते. जिल्ह्यातच नवीन उद्योगांची स्थापना आणि विद्यमान उद्योगांचा विस्तार झाल्यास स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. रोजगार निर्मितीशी संबंधित प्रोत्साहनांच्या तरतुदींमुळे उद्योगांना स्थानिक मनुष्यबळाच्या माध्यमातून उत्पादन आणि व्यवसायवाढ करण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासालाही हातभार लागण्याची अपेक्षा आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भोळे यांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे.