जळगाव : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला कमी अंतरात थेट जोडणाऱ्या जळगाव–जालना या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामांना आता गती मिळू लागली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी लागणाऱ्या शेतजमिनींच्या संपादनासह प्रत्यक्ष मोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, जळगाव जिल्ह्यातील नेमकी किती जमीन या प्रकल्पासाठी संपादित होईल, त्याचीही माहिती समोर आली आहे.

जळगाव ते जालना दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाची एकूण लांबी सुमारे १७४ किलोमीटर इतकी आहे. यापैकी जवळपास १४० किलोमीटरचा भाग जालना जिल्ह्यातून जाणार आहे, तर उर्वरित ३४ किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये थेट रेल्वे संपर्क निर्माण होणार आहे. सध्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र यादरम्यान रेल्वेने प्रवास करताना मोठा वळसा घ्यावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात.

मात्र, नवीन मार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून, तो अधिक सुलभ आणि किफायतशीर ठरण्याची अपेक्षा आहे. यासोबतच या रेल्वे मार्गामुळे माल वाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे. उद्योग, शेतीमाल आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्त्वाचा दुवा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे विकासाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

जळगाव तालुक्यातील ८६.६९ हेक्टर क्षेत्र

जळगाव–जालना प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी जळगाव जिल्ह्यातील भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव व जामनेर तालुक्यातील निवडक गावांमधील शेतजमिनी संपादित करण्याची कार्यवाही सुरू झाली असून, महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या पथकांकडून प्रत्यक्ष मोजणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
पैकी जळगाव तालुक्यातील तरसोद, पिंपळे, कुसुंबा, आसोदा, देव्हारी, धानवड, मन्यारखेडा तसेच जळगाव बुद्रुक परिसरातील एकूण सुमारे ८६.६९ हेक्टर शेतजमिनींचे क्षेत्र संपादित केले जाणार आहे. संबंधित सर्व शेतकऱ्यांना अधिसूचनेनुसार पूर्वकल्पना देण्यात आली असून, प्राथमिक टप्प्यात बैठका घेऊन प्रकल्पाचे स्वरूप, संभाव्य लाभ व मोबदला प्रक्रियेची माहिती देण्यात आली होती. सध्या तलाठी, मंडळ अधिकारी व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतजमिनींची सीमारेषा निश्चित करून मोजणी केली जात आहे. यामध्ये सातबारा उतारे, नकाशे व प्रत्यक्ष जमिनीची पाहणी यांचा आधार घेतला जात आहे.

जामनेर तालुक्यातील १२४.१६ हेक्टर क्षेत्र

जालना रेल्वे मार्गासाठी जामनेर तालुक्यातील मोहाडी, पाळधी, पहूर, सुनसगाव, करमाड, देवपिंप्री आणि पळासखेडा या गावांमधील शेतजमिनींच्या संपादन प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे. या तालुक्यात सुमारे १२४.१६ हेक्टर क्षेत्र रेल्वे मार्गासाठी संपादित होणार आहे. जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्र येत असल्याने प्रशासनाकडून शेतकऱ्यांशी संवाद साधत टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबवली जात आहे. गेल्या वर्षी प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित गावांच्या हद्दीतील शेतजमिनींच्या संपादनासाठी अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार प्राथमिक हरकती मागविण्यात आल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी मोजणी व मोबदल्याबाबत शंका उपस्थित केल्याने अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बैठका घेऊन त्या स्पष्ट केल्या. आता मोजणी प्रक्रिया सुरू झाल्याने पुढील टप्प्यात अंतिम मोबदला निर्धारणाची कार्यवाही होणार आहे.