जळगाव : जळगाव–जालना हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. सुमारे १७४ किलोमीटर लांबीच्या या रेल्वे मार्गासाठी अंदाजे ७,१०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्ह्यात प्रस्तावित पाचोरा–जामनेर–बोदवड रेल्वेमार्गाला छेदणाऱ्या या मार्गासाठी भव्य उड्डाणपूल (ओव्हर रेल) उभारण्यात येणार आहे.
जळगाव–जालना रेल्वे मार्गासाठी जळगाव शहर व परिसरात प्रत्यक्ष रेल्वे रूळ टाकण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व प्राथमिक कामे गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आली आहे. मार्ग निश्चितीसह मोजणी, समतलीकरण, तांत्रिक तपासणी तसेच आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी, अशा विविध टप्प्यांवर काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले जात असून, कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला अधिक वेग येणार असल्याचे संकेत देण्यात येत आहेत. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर जळगाव आणि जालना जिल्ह्यास थेट रेल्वे जोडणी मिळू शकेल. प्रवासी व मालवाहतुकीला मोठी चालना मिळेल. औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आंध्र प्रदेश, दक्षिण भारताशी संपर्क
जळगाव–जालना मार्गामुळे जळगावमार्गे गुजरात व राजस्थानकडे जाणाऱ्या तसेच तिकडून येणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांना आंध्र प्रदेश आणि दक्षिण भारताशी अधिक वेगवान व थेट संपर्क मिळणार आहे. परिणामी, लांब पल्ल्याच्या प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होऊन वाहतुकीचा खर्चही घटण्यास मदत होणार आहे. माल वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून, व्यापार व उद्योग क्षेत्राला याचा थेट लाभ मिळेल. विशेषतः जालना जिल्ह्यातील राजूर येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी हा रेल्वे मार्ग अधिक सोयीस्कर ठरणार आहे. जागतिक वारसा स्थळ अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना या मार्गामुळे सहज आणि जलद प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कुठे उभारला जाईल उड्डाणपूल?
जळगाव–जालना हा एकूण १७४ किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्यापैकी जवळपास १४० किलोमीटरचा मार्ग जालना जिल्ह्यातून तर ३४ किलोमीटरचा मार्ग जळगाव जिल्ह्यातून जाणार आहे. या मार्गासाठी आवश्यक जमिनीचे संपादन करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या कार्यवाही सुरू आहे. जळगाव–भुसावळ रेल्वे मार्गावरील भादली स्थानकापासून जालना मार्ग निघणार असल्याने त्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. हा प्रस्तावित नवीन रेल्वेमार्ग पाचोरा–जामनेर–बोदवड रेल्वेमार्गाला ३०.५ मीटर ओव्हर रेल्वे ब्रिजच्या (ओआरबी) माध्यमातून ओलांडणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. हा उड्डाणपूल नवीन पहुर रेल्वे स्थानकापासून सुमारे १.२ किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणार आहे. पाचोरा–बोदवड रेल्वे मार्गावर क्रॉसिंगमुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाचा पर्याय निवडण्यात आला आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विना अडथळा सुरळीत राहणार आहे.
