जळगाव : मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण समजला जाणारा साखरपुड्याचा कार्यक्रम अवघ्या पाच दिवसांवर आलेला असताना तिच्या आईने प्रियकरासोबत पलायन करून विवाह केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील जामनेरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, प्रियकराने व्हॉट्सॲप स्टेटसवर लग्नाचे छायाचित्र पोस्ट केल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर सामाजिक, मानसिक आणि भावनिक संकट कोसळले असून परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या मुलीचा साखरपुडा येत्या गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी दोन्ही कुटुंबांकडून जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईकांना निमंत्रणे देण्यात आली होती. साखरपुड्याच्या खरेदीसह विविध तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला अचानक घरातून निघून गेली. तिने कुठे जात असल्याची कोणालाही माहिती दिली नव्हती. तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तिचा मोबाईल बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

असा उघड झाला संपूर्ण प्रकार

महिला अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या पतीसह नातेवाईकांनी विविध ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. मित्र परिवारासह नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करण्यात आली. मात्र महिलेचा कोणताही मागमूस लागत नव्हता. मुलीचा साखरपुडा जवळ आल्याने कुटुंबीय अधिकच चिंतेत होते. महिला सुरक्षित आहे की नाही, याबाबतही कुटुंबियांना काळजी वाटत होती.

दरम्यान, महिलेच्या कथित प्रियकराने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर त्यांच्या विवाहाची छायाचित्रे अपलोड केली. या छायाचित्रांमध्ये दोघेही वधू-वराच्या वेशात दिसत होते. काही परिचितांच्या निदर्शनास हे स्टेटस आल्यानंतर त्यांनी तत्काळ कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर स्टेटस तपासण्यात आले असता संबंधित महिला आणि तिच्या प्रियकराने विवाह केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला.

हतबल पतीची पोलिसांकडे धाव

मुलीच्या साखरपुड्याच्या काही दिवस आधीच आईने घर सोडून प्रियकरासोबत विवाह केल्याची बातमी गावात आणि नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे संबंधित कुटुंबियांना गावात कुठे तोंड दाखवायला जागा उरली नाही. विशेषतः उपवर मुलगी आणि तिच्या वडिलांना समाजातील चर्चांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जाते.

मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावर याचा परिणाम होईल का, याबाबतही चर्चा सुरू झाली. घडलेल्या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पतीने अखेर जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असून व्हॉट्सॲपवरील लग्नाची छायाचित्रे आणि स्टेटस समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असल्याने कुटुंबाची बदनामी होत असल्याची व्यथा त्याने पोलिसांसमोर मांडली. संबंधितांनी ते स्टेटस हटवावे, अशी विनंतीही त्याने केली.

पोलिसांनी दिली समज

पतीची तक्रार ऐकल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल केली. संबंधित प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्याच्याशी चर्चा करून सोशल मीडियावरून कोणाच्याही भावना दुखावतील अथवा सामाजिक वाद निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती मिळाली. घटनेनंतर जामनेर तालुक्यासह परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

मुलीच्या साखरपुड्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या कुटुंबात घडलेल्या या अनपेक्षित प्रकारामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. वैयक्तिक नातेसंबंध, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, मुलीचा साखरपुडा नियोजित वेळेनुसार पार पडणार की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून कुटुंबियांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.