जळगाव : जिल्ह्यात शासकीय ज्वारी खरेदीसाठी मंगळवारपासून ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रियेला सुरुवात होताच अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी संघांच्या कार्यालयांसमोर शेकडो शेतकरी एकत्र जमल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. टोकन पद्धतीने नोंदणी होणार असल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी टोकन मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली. काही ठिकाणी टोकन हिसकावून घेण्याचे प्रकारही घडले.
भडगाव येथे गोंधळ निर्माण झाल्यालर परिस्थिती हाताळण्यासाठी उपस्थित असलेल्या शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच पोलिसांनाही धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले. दोन दिवसांपूर्वी नोंदणी सुरू होणार असल्याचे पत्र समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने आधीच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक शेतकरी सोमवारी सायंकाळपासूनच शेतकी संघाच्या कार्यालयासमोर मुक्कामी थांबून होते. तर काही शेतकरी मंगळवारी पहाटेपासूनच रांगेत उभे राहिल्याने गर्दी आणखी वाढली होती.
शेतकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भडगाव शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सुरुवातीला एक हजार टोकन वाटप करून त्यानुसार नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पारोळा येथेही मका आणि ज्वारी खरेदीसाठी नोंदणी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत ठिय्या आंदोलन केले.
दिलासा कमी मनस्ताप जास्त
प्रशासनाने तातडीने मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना नियोजनबद्ध पद्धतीने टोकन देण्याचा निर्णय घेण्यात आला. चाळीसगाव येथेही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. टोकन वितरणात अनियमितता असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. अखेरीस पोलीस बंदोबस्तात टोकन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने स्पष्ट केले की बुधवारपासून टोकननुसार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. आणि प्रत्येक शेतकऱ्याला निश्चित वेळेनुसार नोंदणी करता येईल. चांगल्या दराच्या आशेने शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. मात्र, ज्वारी खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीचा ऑफलाईन गोंधळ पाहून अनेक शेतकऱ्यांनी डोक्याला हात लावून घेतला असून, त्यांना दिलासा कमी मनस्ताप जास्त होत आहे.
नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत
किमान आधारभूत किंमत (एमएसपी) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे. राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ एप्रिलपासून शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १८ संस्थांना भरडधान्य खरेदीसाठी मान्यता देण्यात आली असून, यंदा प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रशासनाच्या नियोजनानुसार, शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर १ मे ते ३० जून या कालावधीत प्रत्यक्ष खरेदी सुरू होणार आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना निश्चित वेळापत्रकानुसार धान्य विक्री करता येणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी निर्माण झालेल्या गोंधळामुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
