जळगाव : जिल्ह्यात पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या जळगाव–किनगाव या कोट्यवधी रुपयांच्या काँक्रीट रस्त्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे ९९ कोटी रुपये खर्चून तयार होत असलेल्या या रस्त्याला लोकार्पणापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. अद्याप रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झालेला नसताना पृष्ठभागावर पडलेल्या तड्यांमुळे संबंधित कामाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला जात असून स्वतंत्र तांत्रिक चौकशीची मागणी जोर धरत आहे.

जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सात मीटर रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या प्रकल्पासाठी शासनाने ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रति किलोमीटर सुमारे ४.१२ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. विशेष म्हणजे, काम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षे रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे दर्जेदार आणि दीर्घकाळ टिकणारा रस्ता तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

काँक्रीट मिश्रण, क्युरिंगवर संशय

दरम्यान, काँक्रीटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच रस्त्याच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी लांबच लांब तडे दिसून येत आहेत. काही भागात सूक्ष्म भेगा तर काही ठिकाणी स्पष्टपणे तडे पडल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. रस्ता अद्याप अधिकृतपणे सुरूही झालेला नसताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यात अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि बांधकाम क्षेत्रातील जाणकारांच्या मते, रस्त्याच्या तळाची आवश्यक ती मजबुतीकरण प्रक्रिया व्यवस्थित न करणे, काँक्रीट मिश्रणातील प्रमाणात त्रुटी राहणे किंवा काँक्रीटीकरणानंतर आवश्यक कालावधीपर्यंत योग्य पद्धतीने क्युरिंग (पाणी देणे) न करणे, ही तडे पडण्यामागील प्रमुख कारणे असू शकतात. काहींनी दर्जाहीन साहित्याच्या वापराचाही संशय व्यक्त केला आहे. या सर्व बाबींची प्रयोगशाळा स्तरावर तपासणी झाल्याशिवाय वस्तुस्थिती स्पष्ट होणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

जळगाव ते किनगाव काँक्रीट रस्त्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक निधीतून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात सुरुवातीलाच अशा प्रकारच्या त्रुटी आढळत असतील, तर संबंधित यंत्रणेच्या गुणवत्ता तपासणी प्रक्रियेबाबत गंभीर शंका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित रस्त्याची स्वतंत्र तांत्रिक समितीकडून पाहणी करण्यात यावी, काँक्रीटच्या गुणवत्तेची कोअर टेस्ट, जाडी, मजबुती आणि वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. तपासणीत निष्कृष्ट काम झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंत्राटदार, देखरेख करणारे अधिकारी आणि जबाबदार अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

रस्ता पूर्णपणे दुरुस्त करून आणि गुणवत्तेची खात्री झाल्यानंतरच तो वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा भविष्यात अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता, दर्जेदार काम आणि प्रभावी देखरेख सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून या प्रकरणात त्याची कसोटी लागणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित कंत्राटदाराचीअधिकृत भूमिका समोर आलेली नसून नागरिकांचे आरोप आणि तडे पडल्याच्या घटनेची वस्तुस्थिती समोर आल्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.

जळगाव ते किनगाव रस्त्याला काँक्रीटीकरणादरम्यान काही भागात तडे पडल्याचे तपासणीतून आढळले आहे. रस्त्याचा तेवढा भाग काढून पुन्हा नव्याने काँक्रीटचा करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात येतील. – इम्रान शेख (कार्यकारी अभियंता, पायाभूत सुविधा विकास महामंडळ)