जळगाव : जिल्ह्यात पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हायब्रीड ॲन्युटी योजनेअंतर्गत सुमारे १०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या जळगाव–किनगाव काँक्रीट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अखेर संबंधित यंत्रणेने दखल घेतली आहे. लोकार्पणापूर्वीच या रस्त्याच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी तडे गेल्याचे ‘लोकसत्ता’ने सचित्र वृत्ताद्वारे निदर्शनास आणून दिल्यानंतर तडे गेलेला निकृष्ट भाग फोडून पुन्हा नव्याने काँक्रीटीकरण करण्याच्या कामाला संबंधित कंत्राटदाराने सुरुवात केली आहे.

लोकार्पणापूर्वीच रस्त्यावर तडे

दोन राष्ट्रीय महामार्ग जोडणाऱ्या जळगाव ते किनगाव या राज्य मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येत असून त्यासाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, रस्ता पूर्णत्वास जाण्यापूर्वीच काही ठिकाणी काँक्रीटच्या पृष्ठभागावर तडे पडल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी तडे स्पष्टपणे दिसत असल्याने वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांकडून रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून तयार होणाऱ्या रस्त्याला लोकार्पणापूर्वीच तडे जाणे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. रस्ता भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा भार सहन करणार असल्याने सध्याच्या त्रुटी दूर करूनच तो वाहतुकीसाठी खुला करावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती.

‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रशासनाची दखल

रस्त्यावरील तडे आणि खराब झालेल्या भागाचे सचित्र वृत्त ‘लोकसत्ता’ने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले. या वृत्तामुळे रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. नागरिकांच्या तक्रारी आणि वृत्ताची दखल घेत पायाभूत सुविधा विकास महामंडळाने संबंधित कंत्राटदाराला आवश्यक सूचना देण्याचे स्पष्ट केले. रस्त्याचा निकृष्ट किंवा तडे गेलेला भाग कायम ठेवण्याऐवजी तो फोडून काढण्यात यावा आणि त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशा सूचना कंत्राटदाराला देण्यात येतील, असे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित यंत्रणा या त्रुटींवर काय कारवाई करते, याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले होते.

तडे गेलेला भाग फोडून नव्याने काम

महामंडळाच्या सूचनेनंतर आता संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. तडे गेलेल्या भागातील काँक्रीट फोडून काढण्यात येत असून खराब झालेला भाग हटवून त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरण केले जाणार आहे. रस्त्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना केवळ वरवरची डागडुजी न करता तडे जाण्यामागील कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. काँक्रीटची गुणवत्ता, त्याचे मिश्रण, बेसची मजबुती तसेच रस्ते बांधकामासाठी निर्धारित तांत्रिक निकषांचे पालन झाले आहे की नाही, याची तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. भविष्यात पुन्हा तडे पडू नयेत, यासाठी दुरुस्तीचे काम तांत्रिक पद्धतीने आणि निर्धारित मानकांनुसार करण्यात यावे, अशी अपेक्षा वाहनधारक व्यक्त करीत आहेत.