जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील दादर ज्वारीची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी देखील विक्रमी आवक झाली. ग्राहकांची मागणी चांगली असल्याने ज्वारीला दर देखील चांगल्या प्रकारे मिळताना दिसून आले.  

रब्बी हंगामातील विविध पिकांची काढणी सुरु होताच जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दादर ज्वारीची आवक वाढल्याचे पाहायला मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीअखेर शनिवारी बाजार समितीत दादर ज्वारीची सुमारे ३६० क्विंटलपर्यंत आवक झाली होती. आणि त्या दिवशी ज्वारीला किमान २६०० रुपये, कमाल ४२०० रुपये आणि सरासरी ३९०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता. रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बाजार समितीतील व्यवहार बंद होते. त्यामुळे सोमवारी बाजार उघडल्यानंतर तब्बल ८२० क्विंटलपर्यंत दादर ज्वारी बाजारात दाखल झाली. आवक दुपटीपेक्षा जास्त असतानाही दरात मात्र तेजीचे चित्र दिसून आले.

सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत दादर ज्वारीला किमान २९०० रुपये, कमाल ४६३० रुपये आणि सरासरी ४००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. विशेष म्हणजे, आवक मोठ्या प्रमाणात असतानाही दरात घसरण न होता उलट सरासरी दरात वाढ झाल्याचे चित्र दिसले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, दर्जेदार मालाला चांगली मागणी असल्याने उच्चांकी दर मिळत आहेत. आगामी काळात आवक आणि मागणी यानुसार दरात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मेक्सिको हरभऱ्याला सर्वाधिक दर

कृषी उत्पन्न बाजार समितीत दादर ज्वारीनंतर हरभऱ्याच्या विविध वाणांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी हरभऱ्याच्या चाफा वाणाची ३३४ क्विंटल आवक होऊन त्यास ४५०० ते ५०६०, सरासरी ५०५५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गुलाबी वाणाची ११४ क्विंटल आवक होऊन त्यास ५२६५ ते ६०४५, सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गुल्लर वाणाची २७ क्विंटल आवक होऊन त्यास ४७०० ते ६७४५, सरासरी ६०९५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. चिणोली वाणाची ६८ क्विंटल आवक होऊन त्यास ५५०० ते ६६२५, सरासरी ६४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

पीकेव्ही २ वाणाची २३ क्विंटल आवक होऊन त्यास सरासरी ५४०५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मेक्सिको वाणाची ४ क्विंटल आवक झाली आणि त्यास सरासरी ८०३५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर हरभऱ्याच्या काबली वाणाची १९ क्विंटल आवक झाली. आणि त्यास ६१६५ ते ६६५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.