जळगाव : जिल्ह्यातील जळगावच्या कृषी विज्ञान केंद्राचा कथित भ्रष्टाचार, निधीचा गैरवापर आणि प्रशासकीय अनियमिततेचा मुद्दा लोकसभेत जोरदारपणे उपस्थित करत खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालयाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची तत्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
महात्मा ज्योतीबा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात झालेल्या कथित अनियमितता आणि गैरकारभाराचा मुद्दा आमदार किशोर दराडे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधान परिषदेत नुकताच उपस्थित केला. या प्रकरणात संबंधित कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती यांना तातडीने निलंबित करण्याचे निर्देशही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, कृषिमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर, खासदार स्मिता वाघ यांनी थेट संसदेत कृषी विज्ञान केंद्रातील गैरकारभाराकडे कृषी मंत्रालयाचे लक्ष वेधले.
संसदेत बोलताना खासदार वाघ म्हणाल्या की, भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) मार्फत कृषी विज्ञान केंद्राला देण्यात येणाऱ्या निधीचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, प्रत्यक्षात जळगावच्या विज्ञान केंद्राकडून निधीचा अपव्यय होत असून, मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरातील जुनी व उपयुक्त झाडे अनधिकृतपणे तोडण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्रसामग्रीचा वैयक्तिक वापर केल्याचे आरोप असून, शासकीय संसाधनांचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मी स्वतः या केंद्राला भेट दिली असता अनेक त्रुटी आणि अनियमितता निदर्शनास आल्या. शेतकऱ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत
या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित करताना खासदार वाघ यांनी सांगितले की, हा मुद्दा यापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेतही उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत स्वतंत्र आणि सखोल चौकशी समिती नेमण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रे त्यांच्या मूळ उद्दिष्टांनुसार कार्यरत राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी विज्ञान केंद्र हे शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र असावे. गैरव्यवहाराचे केंद्र नव्हे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, या मुद्द्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून लवकरच उत्तर अपेक्षित असून, जळगाव जिल्ह्यातील शेतकरी वर्गात या प्रकरणामुळे नाराजीचे वातावरण असल्याचे समोर आले आहे. खासदार स्मिता वाघ यांनी हा विषय संसदेत मांडल्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असून, आता पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
