जळगाव : नाशिक येथील कुंभमेळ्याशी संबंधित बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक तनय महाजन याच्यासह काही संशयितांचा सहभाग समोर आल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही मोठी नावे आणि मोठ्या रकमेचे व्यवहार समोर येत असल्याचा दावा खुद्द मंत्री महाजन यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जळगावमधील पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदन देऊन मंत्री महाजन यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, विनायक पाटील, राजू मोरे, सुनील माळी, किरण राजपूत आदींनी ही मागणी केली आहे. बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून शासनाच्या यंत्रणेशी संबंधित आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार झाला असल्याचा आरोप करत या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता केवळ स्थानिक पातळीवरील तपास पुरेसा नसल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अनेक संशयित पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाच्या तपासादरम्यान शोएब शेख, तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यासह अन्य काही संशयित पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. त्यांची चौकशी सुरू असून बनावट कागदपत्रे, वर्कऑर्डर तयार करण्याची पद्धत, संबंधित व्यवहार आणि त्यामागील व्यक्तींची भूमिका याबाबत तपास यंत्रणा माहिती घेत आहे. प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आर्थिक व्यवहारांची साखळी किती मोठी आहे, याचा तपास सुरू आहे. तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाची राजकीय चर्चा अधिक तीव्र झाली. विरोधकांनी या नातेसंबंधाचा मुद्दा उपस्थित करत मंत्री महाजन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दोषींवर कठोर कारवाईची महाजनांची भूमिका

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी बनावट वर्क ऑर्डर प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. तनय महाजन हा आपला दूरचा नातेवाईक असल्याचे सांगताना त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका महाजन यांनी घेतली. या प्रकरणात तनय महाजनपेक्षाही काही मोठी नावे आणि मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती समोर येत असल्याचेही महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे तपासाचा विस्तार वाढण्याची शक्यता असून, या कथित आर्थिक व्यवहारांमागील सूत्रधार कोण, याकडे आता लक्ष लागले आहे.

सीबीआय चौकशीची मागणी

प्रकरणाची व्याप्ती आणि त्यातील राजकीय संबंधांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. तपास स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा, तसेच संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका तपासली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, पोलिसांच्या तपासातून पुढे येणारी माहिती आणि संशयितांच्या चौकशीतून कोणती नवी नावे समोर येतात, याकडे राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि संबंधित व्यक्तींची जबाबदारी तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असून, सध्या पोलिस तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष आहे.