जळगाव : शेतीच्या गट हिस्सा आणि पोटहिस्स्याच्या अधिकृत मोजणीसाठी शेतकऱ्याकडून तब्बल ७१ हजार ७०० रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी जळगाव येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयातील भूकरमापक आणि कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

या प्रकरणातील संशयित राहुल ताराचंद कोळी (३२) हे भूमिअभिलेख विभागात भूकरमापक म्हणून कार्यरत असून, कल्पेश सोमनाथ पाटील (३२) हा कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर आहे. तक्रारदार शेतकऱ्याची जळगाव तालुक्यातील एका गावाता गट क्रमांक ६ मध्ये शेती आहे. सदर जमिनीच्या गट हिस्सा व पोटहिस्स्याची पडताळणी करून अधिकृत मोजणी व्हावी, यासाठी त्यांनी जळगाव येथील भूमिअभिलेख विभागाच्या उपअधीक्षक कार्यालयात नियमानुसार अर्ज दाखल केला होता. या कामासाठी आवश्यक शासकीय शुल्कही भरले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही काम करण्यासाठी भूकरमापक राहुल कोळी यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या भावाच्या उपस्थितीत सुमारे ७० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

शेतकऱ्याची थेट एसीबीकडे तक्रार

दरम्यान, लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने १७ जुलै रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर एसीबीने पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. या पडताळणीत भूकरमापक कोळी यांनी मोजणीच्या दिवशी व्यवहार करण्याचे सांगितल्याची नोंद करण्यात आली. याचदरम्यान कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर कल्पेश पाटील याने नोटीस पाठविण्यासाठी मुद्रांक शुल्काच्या नावाखाली ६२५ रुपये अतिरिक्त रक्कम मागितल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे एसीबीने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचण्याचा निर्णय घेतला.

करंज बसस्थानकाजवळ अंतिम व्यवहार

ठरल्याप्रमाणे बुधवारी संशयित राहुल कोळी हे एका खासगी मदतनीसासह तक्रारदाराच्या शेतात मोजणी करण्यासाठी गेले. प्रत्यक्ष मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तक्रारदाराला करंज (ता. जळगाव) येथील बसस्थानकाजवळ पुढील बोलणीसाठी बोलावले. या ठिकाणी कोळी यांनी स्वतःसाठी आणि कार्यालयाच्या नावाखाली ७० हजारांची मागणी केली. त्याचबरोबर दोन वेळा नोटीस पाठविल्याच्या कारणावरून १२०० रुपये आणि खासगी मदतनीसाला देण्यासाठी ५०० रुपये, अशी अतिरिक्त रक्कमही मागितली. अशाप्रकारे एकूण ७१ हजार ७०० रुपये स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली.

रंगेहाथ पकडताच खळबळ

पूर्वनियोजित सापळ्यानुसार एसीबीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दबा धरून होते. संशयितांनी लाचेची रक्कम स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करताच पथकाने तत्काळ कारवाई करून त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईनंतर भूमिअभिलेख विभागात मोठी खळबळ उडाली. संशयितांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होताच ताब्यातील संशयितांना अटक करण्यात येणार आहे. लाचेची मागणी, त्यामागील कारणे तसेच यापूर्वी अशा प्रकारे इतरांकडूनही पैसे उकळले गेले होते का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, उपनिरीक्षक सुरेश पाटील तसेच पोलीस कर्मचारी संगीता पवार, प्रदीप पोळ, भूषण पाटील आणि मनोज पाटील यांनी सापळा यशस्वी करून संशयितांना जाळ्यात अडकविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.