जळगाव : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना जिल्ह्यात लिंबाच्या दरांनी विक्रमी झेप घेतली आहे. आवक घटल्यामुळे घाऊक बाजारात लिंबाला अलीकडे चांगला दर मिळत असून, त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबू प्रति क्विंटल ९००० ते ११,००० रुपये दराने विकला जात असताना, किरकोळ बाजारात लिंबाचा दर थेट २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला आवारात दररोज केवळ पाच ते सहा क्विंटल इतकीच लिंबाची आवक होत आहे. सामान्य परिस्थितीत यापेक्षा दुप्पट ते तिप्पट आवक होत असते. मात्र, यंदा काही भागांत उत्पादन घटल्यामुळे बाजारात विक्रीयोग्य मालाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये लिंबासाठी स्पर्धा वाढली असून लिलावात दर झपाट्याने वाढत आहेत. जळगाव जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यातच तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. उष्णतेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात लिंबूपाणी, सरबत, पन्हे आणि इतर थंड पेयांचा वापर करत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर तसेच फेरीवाले यांच्याकडूनही लिंबाची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. त्यामुळे बाजारात लिंबाची मागणी अचानक वाढली आहे.
मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही लिंबू महागात घ्यावा लागत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात लिंबाचा दर १८० ते २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. काही ठिकाणी लिंबू नगाप्रमाणे विकला जात असून, एका लिंबासाठी ग्राहकांना पाच रुपये मोजावे लागत आहेत. आकार आणि गुणवत्तेनुसार काही विक्रेते सहा ते सात रुपये दरही आकारत असल्याचे दिसून येत आहे.
काही महिन्यांत दर दुपटीने वाढले
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यापर्यंत चांगल्या दर्जाचा लिंबू बाजार समितीत ५००० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात होता. त्या वेळी बाजारात आवकही चांगली होती. मात्र, फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होऊ लागल्यानंतर अचानक लिंबाची मागणी वाढली. आणि आवक कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे काही महिन्यांतच लिंबाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. दरवाढीमुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना सध्या चांगला दर मिळत आहे. बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या लिंबाला प्रति क्विंटल ११,००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, उत्पादनाचे प्रमाण मर्यादित असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत नसल्याचेही काही व्यापाऱ्यांनी नमूद केले.
आणखी दर वाढण्याची चिन्हे
बाजार समिती सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही आठवड्यांत उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर लिंबाची मागणी आणखी वाढेल. मात्र, बाजारात आवक वाढली नाही तर लिंबाचे दर पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे येत्या काळात लिंबू २०० रुपयांपेक्षा अधिक दराने विकला जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लिंबाची नवीन हंगामातील आवक वाढल्यानंतरच बाजारात दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत वाढत्या उन्हासोबत लिंबाचे दरही चढेच राहतील, असे चित्र सध्या जळगावच्या बाजारात दिसून येत आहे. वाढत्या दरांमुळे सामान्य ग्राहकांना मात्र लिंबू खरेदी करताना चांगलाच विचार करावा लागत आहे.
