जळगाव : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर करणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. थकबाकी न भरता वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरी करणाऱ्या आणखी दोन ग्राहकांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही प्रकरणांत ग्राहकांनी स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीज वापरल्याचे महावितरणच्या तपासणीत आढळले आहे.
यापूर्वी शुक्रवारी अशाच प्रकारच्या तीन ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी आणखी दोन प्रकरणे समोर आल्याने स्मार्ट मीटर बसविल्यानंतरही काही ग्राहकांकडून वीजचोरीचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
थकबाकी न भरता वीज वाहिनीवर आकडा
जळगाव शहरातील नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी परिसरातील रहिवासी संजय भगवान महाजन यांच्या वीज जोडणीचा थकबाकीमुळे स्मार्ट मीटरमधून वीजपुरवठा आपोआप खंडित करण्यात आला होता. मात्र, थकबाकीची रक्कम न भरता त्यांनी घराशेजारील लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरू केल्याचे महावितरणच्या पथकाच्या तपासणीत आढळले. तपासणीत महाजन यांनी सुमारे २१२० रुपयांची वीजचोरी केल्याचे समोर आले. दुसऱ्या घटनेत सुप्रीम कॉलनीतील रहिवासी अकिब शाह अब्दुल रहमान शाह यांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी स्मार्ट मीटरद्वारे खंडित करण्यात आला होता. मात्र, त्यांनीही अधिकृत वीज जोडणी बंद असताना वीज वाहिनीवर आकडा टाकून वीज वापरल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या प्रकरणात सुमारे १२३० रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणने नमूद केले आहे.
कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल
महावितरणचे सहायक अभियंता विशाल नेमाडे यांच्या तक्रारीवरून दोन्ही ग्राहकांविरोधात भारतीय विद्युत कायद्यातील कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे १० ऑगस्ट रोजी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत. दरम्यान, थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी परस्पर वीज जोडणी केली आहे का, याची तपासणी करण्यासाठी महावितरणने विशेष पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून परिसरनिहाय तपासणी केली जात असून, अधिकृत जोडणी नसतानाही वीज वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
स्मार्ट मीटरनंतर महावितरणसमोर आव्हान
स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित करण्याची सुविधा उपलब्ध झाली असली, तरी त्यानंतर ग्राहकांकडून परस्पर जोडणी करून वीज वापरण्याचे प्रकार महावितरणसमोर नवे आव्हान निर्माण करत आहेत. त्यामुळे केवळ स्मार्ट मीटर बसविणे पुरेसे नसून, त्यानंतरच्या अनधिकृत जोडण्यांवर प्रभावी देखरेख आणि तातडीची कारवाईही आवश्यक ठरत आहे. जळगाव शहरात अशा प्रकरणांमध्ये सलग कारवाई सुरू झाल्याने थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून अधिकृत वीजपुरवठा सुरू करून घ्यावा, अन्यथा वीजचोरीप्रकरणी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट संदेश महावितरणने दिला आहे.
