जळगाव : ग्राहकाला कमी वीज बिलाचे आमिष दाखवून स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करत वीज चोरीस मदत केल्याप्रकरणी महावितरणने एका जणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील कांचननगर परिसरात हा प्रकार उघडकीस आला असून पवन डिगंबर कांडेलकर याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या कारवाईमुळे स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरीला प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महावितरणच्या शनिपेठ कक्षांतर्गत नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमधून वीज चोरी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार कांचननगरातील रवींद्र पंढरी येशे यांच्या घराची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. सहायक अभियंता नितीन तायडे, प्रधान तंत्रज्ञ संतोष पाटील आणि वरिष्ठ तंत्रज्ञ नीलेश चौधरी यांच्या पथकाने वीजमीटर तसेच संपूर्ण वीजपुरवठ्याची सखोल तपासणी केली. त्यावेळी स्मार्ट मीटरला बायपास करून वीज वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान वीजचोरीचा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित ग्राहकाला एक हजार रुपयांचे वीज चोरीचे देयक देण्यात आले. ग्राहकाने ते देयक भरले. तसेच त्याने महावितरणकडे दिलेल्या लेखी जबाबात मीटरमध्ये छेडछाड कशी करण्यात आली, याबाबत माहिती दिली.

नवीन मीटर बसविताना २ हजारांची मागणी

ग्राहकाच्या जबाबानुसार, २७ जुलै २०२६ रोजी स्मार्ट मीटर बसविण्याच्या वेळी महावितरणने नेमलेल्या खासगी एजन्सीचा कर्मचारी पवन डिगंबर कांडेलकर (२४) याने जुने मीटर बदलून नवीन स्मार्ट मीटर बसविताना दोन हजार रुपयांची मागणी केली. नवीन मीटरमध्ये काम करून दिल्यास वीज बिल खूपच कमी येईल आणि हा प्रकार कोणाच्याही लक्षात येणार नाही, असे आमिष दाखविल्याचे ग्राहकाने जबाबात नमूद केले आहे. ग्राहकाने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, विविध कारणे सांगून वीज बिल कमी येण्याचे आमिष दाखवत त्याच्याकडून दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीज वापर सुरू करण्यात आल्याचे तपासणीत आढळून आले.

ग्राहकावर मात्र कारवाई नाही

संबंधित ग्राहकाने वीज चोरीचे देयक भरलेले असल्याने तसेच हा गुन्हा तडजोडपात्र असल्यामुळे त्याच्याविरुद्ध महावितरणकडून पोलिसांत स्वतंत्र तक्रार करण्यात आली नाही. मात्र, महावितरणच्या मालकीचे वीज मीटर व वीज जोडणीमध्ये छेडछाड करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याने मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.पवन कांडेलकर याने वीज चोरीस मदत करण्याच्या उद्देशाने महावितरणच्या मालमत्तेत छेडछाड केली. तसेच वीज जोडणीमध्ये फेरफार करून कंपनीचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सहायक अभियंता नितीन तायडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीटरमध्ये छेडछाड केल्यास कारवाई

दरम्यान, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणारी वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणकडून तपासणी मोहीम सुरू असतानाच कंपनीने नियुक्त केलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याकडूनच ग्राहकाला मीटरमध्ये छेडछाड करून देण्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वीज चोरीसाठी ग्राहकांना आमिष दाखविणे, मीटरमध्ये फेरफार करणे किंवा कंपनीच्या यंत्रणेत छेडछाड करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.