जळगाव : महावितरणच्या जळगाव परिमंडलात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) मीटरमुळे वीज वितरण व्यवस्थेत मोठा बदल घडत असून, घरगुती ग्राहकांना त्याचा थेट आर्थिक फायदा होत आहे. विजेचा वापर अचूक मोजणे, तो मोबाईलवर दर तासाला पाहणे आणि वापरावर नियंत्रण ठेवणे, या सुविधा उपलब्ध झाल्याने ग्राहक अधिक सुजाणपणे वीज वापर करताना दिसत आहेत.

स्मार्ट टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांच्या घरातील विजेचा वापर दर तासाला मोबाईलवर पाहता येत असल्याने वीज वापरावर थेट नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. यामुळे वॉशिंग मशीन, गिझर, एअर कंडिशनर, ओव्हन यांसारख्या उपकरणांचा वापर सवलतीच्या वेळेत करून ग्राहक वीज बिलात बचत करत आहेत. अचूक रीडिंगमुळे चुकीची बिले येण्याची शक्यता कमी झाली असून बिलिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे. महावितरणकडून हे अत्याधुनिक टीओडी मीटर पूर्णपणे मोफत बसवले जात असून, त्यासाठी ग्राहकांना कोणताही आर्थिक भुर्दंड बसत नाही. हे मीटर प्री-पेड नसून पोस्टपेड आहेत, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच वीज वापरानंतरच बिल दिले जाते. या प्रणालीत मानवी हस्तक्षेपाला वाव नसल्याने अचूकता आणि विश्वासार्हता वाढली आहे.

टाईम ऑफ डे प्रणालीमुळे वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जात असून, औद्योगिक क्षेत्रानंतर आता घरगुती ग्राहकांसाठीही ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वीज वापराचे संतुलन राखण्यास मदत होत असून वितरण व्यवस्था अधिक कार्यक्षम बनत आहे. टीओडी सवलतीचा लाभ घेण्यासाठी घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर असणे आवश्यक असल्याने ग्राहकांनी मीटर बसवण्यासाठी महावितरण आणि संबंधित एजन्सींना सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांनी केले आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना आर्थिक बचतीसह वीज वापराचे नियोजन करण्याची प्रभावी संधी उपलब्ध झाली आहे.

जळगाव मंडलात सर्वाधिक सवलत

जळगाव परिमंडलातील एकूण ३,२५,३३६ घरगुती ग्राहकांना जुलै २०२५ ते मार्च २०२६ या नऊ महिन्यांच्या कालावधीत २,५६,९४,००० रुपयांची टीओडी सवलत मिळाली आहे. यामध्ये जळगाव मंडलातील २,०६,६८३ ग्राहकांना १,४६,०१,००० रुपये, धुळे मंडलातील ७३,८०५ ग्राहकांना ६१,३४,००० रुपये, तर नंदुरबार मंडलातील ४४,८४८ ग्राहकांना ४९,६४,००० रुपये इतकी सवलत मिळाली आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी निश्चित केलेल्या वीज दरानुसार घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयांपर्यंत सवलत मंजूर केली आहे. १ जुलै २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत प्रतियुनिट ८० पैसे सवलत देण्यात आली असून, पुढील तीन आर्थिक वर्षांत ही सवलत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.