जळगाव : डॉक्टरांनी “घरी घेऊन जा” असा सल्ला दिल्यानंतर कुटुंबीयांनी ५५ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याचा समज करून थेट अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. घरात शोककळा पसरली, स्मशानभूमीत लाकडे पोहचली, नातेवाईकांना निधनाची माहिती देण्यात आली तसेच शोकसंदेश व्हायरल झाले. मात्र, अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान प्रौढाच्या पायाची हालचाल झाल्याने सर्वजण स्तब्ध झाले. गावातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तो जिवंत असल्याचे स्पष्ट होताच काही क्षणांपूर्वीचे दुःख आनंदात बदलले. हा खळबळजनक प्रकार जळगाव तालुक्यातील एका गावात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय प्रौढाची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी करून आवश्यक उपचार केले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांचा फारसा उपयोग होणार नसल्याचे सांगत रुग्णाला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

घरी घेऊन जा”चा अर्थ मृत्यू झाला…

डॉक्टरांनी उपचार निष्फळ ठरण्याची शक्यता व्यक्त करत रुग्णाला घरी नेण्यास सांगितले. मात्र, डॉक्टरांच्या या सल्ल्याचा कुटुंबीयांनी चुकीचा अर्थ काढला. रुग्णाचा मृत्यू झाल्याचे गृहित धरत त्यांनी तातडीने गावात माहिती दिली. काही वेळातच घरात शोकमय वातावरण निर्माण झाले. घरात रडारड सुरु झाली. स्मशानभूमीत सरणासाठी लाकडेही पोहोचली. रुग्णाच्या निधनाची माहिती मिळताच नातेवाईकांना फोन करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी लागणारी तयारी सुरू झाली. स्मशानभूमीत सरणासाठी लाकडे पोहचविण्यात आली. गावातील नागरिकही अंत्यदर्शनासाठी घराकडे येऊ लागले. काही नातेवाईकांनी आपल्या प्रवासालाही सुरुवात केली.

पायाची हालचाल होताच खळबळ

काही नातेवाईकांनी संबंधित प्रौढाच्या निधनाची माहिती सोशल मीडियावरही शेअर केली. त्यामुळे परिसरात ही बातमी वेगाने पसरली. अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त करण्यास सुरुवात केली. काही जण थेट गावाकडे रवाना झाले. अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान अचानक संबंधित प्रौढाच्या पायाची हलकी हालचाल झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. सुरुवातीला हा भास असल्याचे वाटले. मात्र, हालचाल पुन्हा दिसताच घरातील एकच धावपळ उडाली. तातडीने गावातील डॉक्टरांना बोलावण्यात आले.

डॉक्टरांनी तपासणी केली आणि…

गावातील डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली असता त्याची श्वासोच्छ्वासाची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट झाले. रुग्ण जिवंत असल्याचे डॉक्टरांनी सांगताच काही क्षणांपूर्वी शोकमग्न असलेले कुटुंबीय आनंदाश्रूंनी भारावून गेले. उपस्थित ग्रामस्थांनाही मोठा दिलासा मिळाला. निधनाची बातमी मिळाल्याने गावाकडे निघालेल्या नातेवाईकांना तातडीने फोन करून “अंत्यसंस्कार होणार नाहीत, रुग्ण जिवंत आहे” असा संदेश देण्यात आला. अर्ध्या रस्त्यावर पोहोचलेल्या अनेकांना हा संदेश ऐकून धक्काच बसला. काहींनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर काहींना घडलेल्या प्रकारावर विश्वासच बसत नव्हता. या घटनेत कोणत्याही डॉक्टरांनी रुग्ण मृत घोषित केल्याची बाब समोर आलेली नाही. डॉक्टरांनी केवळ रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ काढल्याने हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे.