धुळे : अनैतिक संबंधांच्या संशयातून जळगाव जिल्ह्यातील एका व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आणून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत असे धिवरे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात उपलब्ध मिळालेल्या माहितीनुसार, विजय भिमा राठोड (रा. पिंपळगाव हरे तांडा, जि. जळगाव) यांचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संजय परशुराम जाधव (३५, रा. पिंपळगाव हरे तांडा) याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अनैतिक संबंधातून खून?

अनैतिक संबंधांच्या कारणावरून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार संशयित संजय जाधव हा बैलांच्या व्यापाराचा व्यवसाय करतो. त्याला मृत विजय राठोड आणि त्याच्या पत्नीमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने विजय राठोड यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने संजय जाधव याने विजय राठोड याचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आणल्याचा आरोप आहे.

घटना कुठली आणि कधीची…

२१ फेब्रुवारी २०२६ रोजी संशयित संजय जाधव याने अंजनविहिरे (ता. शिंदखेडा) गावाजवळील पाटाच्या चारी परिसरात, पुलाजवळ असलेल्या पाइपमध्ये विजय राठोड याचा मृतदेह जाळल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. घटनेनंतर संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात जळालेल्या अवशेषांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

पिंपळगाव हरे पोलिस पथक घटनास्थळी…

सध्या पिंपळगाव हरे पोलिस ठाण्याचे पथक तसेच दोंडाईचा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून जळालेल्या मृतदेहाचे अवशेष आणि हाडे शोधण्याचे काम सुरू आहे. या तपासात मदत करण्यासाठी धुळे पोलिसांकडून फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. जळालेल्या अवशेषांची तपासणी करून मृतदेहाची ओळख निश्चित करण्याची प्रक्रिया तपास यंत्रनेतर्फे सुरू आहे.या प्रकरणी पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

फॉरेन्सिक तपासणी

दरम्यान, घटनास्थळी आढळलेल्या जळालेल्या अवशेषांचे नमुने ताब्यात घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया पोलिसांकडून लगेचच पूर्ण करण्यात येऊशकेल. मृतदेह पूर्णतः जळाल्यामुळे ओळख पटविणे प्रारंभी अवघड झाले असले तरी प्रसंगी डीएनए तपासणीच्या माध्यमातून मृताची ओळख निश्चित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनेच्या ठिकाणाचा पंचनामा करून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न…

या प्रकरणामुळे जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकेही तैनात केली आहेत. आरोपीने गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दूरच्या ठिकाणी नेऊन जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून संशयित व त्याच्या पत्नीची चौकशी करून या खून प्रकरणामागील नेमकी पार्श्वभूमी आणि घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.