जळगाव : मध्य रेल्वेच्या जळगाव–मनमाड मार्गावर सध्या धावणाऱ्या गाड्यांचा खोळंबा कमी करून आणखी गाड्या चालविण्यासह वेळेवर रेल्वे संचालनाला चालना देण्यासाठी भुसावळ विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जळगाव–शिरसोली–म्हसावद यादरम्यान स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणालीचे काम पूर्ण करून अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सदर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. या प्रणालीमुळे या विभागाची लाइन क्षमता वाढणार असून त्याचा थेट फायदा जळगाव–मनमाड मार्गावरील रेल्वे वाहतुकीला होणार आहे.

स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगमुळे दोन स्थानकांदरम्यान एकापेक्षा अधिक रेल्वेगाड्यांना सुरक्षित अंतर राखून धावण्याची सुविधा निर्माण होते. त्यामुळे एखादी गाडी पुढील स्थानकात पोहोचेपर्यंत मागील गाडीला अनावश्यक वेळ थांबण्याची गरज कमी होते. परिणामी जळगाव–शिरसोली–म्हसावद विभागाची वहन क्षमता वाढून या मार्गावर अधिक गाड्या चालविणे शक्य होणार आहे. गाड्यांचा अनावश्यक खोळंबा कमी झाल्याने वेळापत्रकानुसार संचालन सुधारण्यास मदत होणार आहे.

प्रवासाचा विलंब कमी होण्यास मदत

रेल्वे वाहतुकीतील महत्त्वाचा अडथळा म्हणजे मार्गाची मर्यादित क्षमता आणि त्यातून होणारा गाड्यांचा खोळंबा. स्वयंचलित सिग्नलिंगमुळे गाड्यांमधील सुरक्षित अंतराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. त्यामुळे गाड्यांना वारंवार सिग्नलवर थांबावे लागण्याचे प्रमाण कमी होऊन परिचालनाचा वेग आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. परिणामी जळगाव–मनमाड विभागातील रेल्वेगाड्यांच्या वेळेवर संचालनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पांतर्गत एसआयपी आणि रोल प्लॅननुसार २९ नवीन स्वयंचलित सिग्नल आणि ८ सेमी-ऑटोमॅटिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. यामुळे रेल्वे वाहतुकीचे नियंत्रण अधिक अचूक आणि सुरक्षित पद्धतीने करता येणार आहे. तसेच फ्राउशर कंपनीच्या मल्टी सेक्शन डिजिटल एक्सल काउंटर प्रणालीचा वापर करण्यात आला असून, त्यामध्ये दुहेरी ट्रॅक तपासणी, रिअल-टाइम निरीक्षण, पर्यवेक्षी ट्रॅक सेक्शन आणि स्वयंचलित रीसेट यांसारख्या सुविधा आहेत.

१५० डिटेक्शन पॉइंटची उभारणी

स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगसाठी एकूण १५० मल्टी सेक्शन डिजिटल एक्सल काउंटर डिटेक्शन पॉइंट बसविण्यात आले आहेत. यापैकी ७२ अप मार्गावर, तर ७८ डाऊन मार्गावर आहेत. या यंत्रणेमुळे रेल्वे रुळावरील गाडीची उपस्थिती आणि संबंधित ट्रॅक सेक्शनची स्थिती अधिक अचूकपणे निश्चित करता येणार आहे. प्रकल्पासाठी ४८-फायबर ऑप्टिकल फायबर केबलचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फेलसेफ नेटवर्क्ड मल्टीप्लेक्सर प्रणालीचा इंटरलॉकिंग कंट्रोल सेंटर तसेच स्थानकावरील स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग डिस्प्लेसाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सिग्नलिंग यंत्रणेमधील माहितीचे संप्रेषण अधिक विश्वासार्ह आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे.

सुरक्षिततेसाठी विविध यंत्रणांचा समावेश

प्रणालीची सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी ईएलडी, फ्यूज अलार्म सेफ्टी आणि आरडीएसओ-मंजूर फायर अलार्म प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. स्वयंचलित सिग्नलिंग हट्सचे आरडीएसओच्या तांत्रिक निकषांनुसार अर्थिंग करण्यात आले आहे. शिरसोली येथील क्योसान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग-६२ मध्ये आवश्यक रूट अल्टरेशन करण्यात आले आहे. एएच-३६ आणि एएच-३५ येथे सीमेंस कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रकल्पाचा भाग म्हणून आवश्यक स्वयंचलित सिग्नलिंग हट्सचे बांधकामही करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण सिग्नलिंग यंत्रणा अधिक आधुनिक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रवाशांना मिळणार थेट फायदा

जळगाव–शिरसोली–म्हसावद विभागातील स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगमुळे केवळ सिग्नलिंग यंत्रणा आधुनिक होणार नसून, संपूर्ण जळगाव–मनमाड रेल्वे विभागाच्या परिचालन क्षमतेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. अधिक गाड्या सुरक्षितपणे चालविणे, गाड्यांचा खोळंबा कमी करणे आणि वेळेवर संचालनाला चालना देणे शक्य होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. मध्य रेल्वेच्या या तांत्रिक सुधारणेमुळे भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीसाठीही या मार्गाची क्षमता बळकट होणार आहे.