जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर सोने आणि चांदी दरात मोठी दरवाढ झाल्याने ग्राहकांना धक्का बसला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही दिसून आला. सोन्यासह चांदीच्या दरात वाढ झाल्याने बाजारात पुन्हा एकदा तेजीचे वातावरण निर्माण झाले.
आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारातील व्यवहारात सोन्याच्या किमतीत सुमारे १.६३ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. त्याचवेळी चांदीच्या किमतीतही सुमारे २.८३ टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही झाल्याने सोन्या-चांदीच्या दरातील वाढीनंतर गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे लक्ष पुन्हा या मौल्यवान धातूंकडे वळले आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चिततेसह डॉलरमधील घसरण आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वाढलेला कल यामुळे सोन्याच्या दरांना आधार मिळत आहे. चांदीच्या बाबतीतही औद्योगिक मागणी आणि गुंतवणुकीसाठी वाढलेली खरेदी यामुळे किमती मजबूत झाल्या आहेत.
देशांतर्गत बाजारात सोन्याबरोबरच चांदीच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. मात्र, गुंतवणूकदारांसाठी ही तेजी सकारात्मक मानली जात असून, अनेकांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे मोर्चा वळविल्याचे चित्र आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, जागतिक आर्थिक घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा कल कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून निर्णय घ्यावेत, असा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
सोन्याचे दर किती वाढले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी ३०९ रुपयांची किरकोळ वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४६,२६० रुपयांपर्यंत पोहचले होते. तर गुरुवारी आणखी ११३३ रुपयांची वाढ झाल्याने सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,४७,३९३ रुपयांपर्यंत गेले होते. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा ३७०८ रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५१,१०१ रुपयांपर्यंत वधारले. सोन्यात गेल्या तीन दिवसांत सुमारे ५१५० रुपयांची वाढ झाल्याची नोंद घेतली गेली.
चांदीचे दर किती वाढले?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत बुधवारी १०३० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,३५,८७० रुपयांपर्यंत खाली आले होते. तर गुरुवारी ३०९० रुपयांची वाढ झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,३८,९६० रुपयांपर्यंत पोहचली होती. शुक्रवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर आणखी ५१५० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो २,४४,११० रुपयांपर्यंत वधारली. चांदीत दोन दिवसांत तब्बल ८२४० रुपयांची वाढ झाल्याची नोंद घेतली गेली.
