जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सातत्याने नवीन उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या सोन्याच्या दरात गुरूवारी पुन्हा मोठे बदल झाले. दसरा-दिवाळीचा सण जवळ येत असताना सोने खरेदीच्या विचारात असलेल्या ग्राहकांमध्ये त्यामुळे काही प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून आले.

नवरात्री उत्सवानंतर आता सगळ्यांचे लक्ष दिवाळीकडे लागले आहे. परंपरेनुसार दिवाळीला सोने–चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र, यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. सोने आणि चांदीच्या दरांनी इतिहासातील सर्वोच्च पातळी गाठली असून, ग्राहकांना दोन्ही धातुंची खरेदी करणे जड जात आहे. त्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवून दर खाली येण्याची वाट पाहण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र, बाजारातील घडामोडी पाहता दर कधी अचानक वाढतात तर कधी एकदम खाली येत असल्याने ग्राहक द्विधा मनःस्थितीत सापडले आहेत. परिणामी, या वर्षी दिवाळी थोडी वेगळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

सोने आणि चांदीचे दर दररोज जाहीर होतात आणि त्यावर अनेक आर्थिक व जागतिक घटकांचा थेट परिणाम होतो. भारतात सोन्याचे स्थान केवळ गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही; ते परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांशी घट्ट जोडलेले आहे. लग्नसमारंभ, उत्सव किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. या परंपरेमुळे मागणी सातत्याने वाढत राहते आणि त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून येतो, असे जाणकारांनी सांगितले.

जळगावात नवरात्रीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सोन्यात प्रति १० ग्रॅम अनुक्रमे ११३३ आणि २१६३ रूपयांची वाढ झाली. त्यामुळे दसऱ्यापर्यंत सोन्याची किंमत आणखी किती उंची गाठते, त्याकडे ग्राहकांसह व्यावसायिकांचे लक्ष होते. प्रत्यक्षात नवरात्रीच्या तिसऱ्या बुधवारी दिवशी २०६ रूपये आणि चौथ्या दिवशी गुरूवारी ८२४ रूपयांची घट झाल्याने सोन्याची उच्चांकी घोडदौड थांबली. बऱ्याच दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहुन ग्राहकांना सुखद दिलासा मिळाला.

शहरात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १७ हजार ९३५ रूपयांपर्यंत होते. गुरूवारी सकाळी ८२४ रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर एक लाख १७ हजार १११ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात तब्बल १०३० रूपयांची घट झाल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला.

चांदीत १०३० रूपयांची वाढ

जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ४० हजार ८० रूपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. बुधवारी दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात आली नाही. मात्र, गुरूवारी बाजार उघडताच १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी प्रति किलो एक लाख ४१ हजार ११० रूपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचली.