जळगाव : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत सिद्ध करणाऱ्या महायुतीकडून इतके दिवस महापौर आणि उपमहापौर पदाच्या उमेदवारांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, सोमवारी अर्ज भरण्याच्या काही वेळेआधी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही नावांची थेट घोषणा केली.

महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट आघाडी घेत महापालिकेतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या होत्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका नगरसेवकासह एका अपक्ष नगरसेवकाने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ ७० वर जाऊन पोहोचले होते. या मजबूत बहुमतामुळे महापालिकेतील सत्तावाटपाचे चित्र जवळपास स्पष्ट झाल्याने महापौर पद भाजपकडे आणि उपमहापौर पद शिवसेनेकडे जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीसाठी गेल्या दोन दिवसांत राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला.

दोन्ही पक्षांमध्ये या महत्त्वाच्या पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः भाजपमध्ये अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होती. त्यामुळे भाजपकडून कोणाला महापौरपदाची संधी मिळणार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उपमहापौर पदासाठी कोणाचे नाव पुढे येणार, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीसाठी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत दोन्ही पदांसाठी नेमके किती अर्ज दाखल होतात आणि कोणाची नावे समोर येतात, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात ही प्रक्रिया केवळ औपचारिक ठरणार, हे आधीपासूनच स्पष्ट झाले होते.

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांकडून महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार आधीच निश्चित करण्यात आल्याने दोन्ही पदांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात होती. त्यामुळे अर्ज दाखल होण्याच्या वेळेपूर्वीच सत्ताधारी महायुतीने आपली रणनीती स्पष्ट केली. सोमवारी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी संयुक्तरित्या दोन्ही पदांसाठी उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केली. त्यांच्या या घोषणेमुळे महापालिकेतील सत्ता समीकरणांवर शिक्कामोर्तब झाले. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत कोणताही विरोधी अर्ज येण्याची शक्यता संपुष्टात आली. आणि दोघांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

या वेळी बोलताना दोन्ही मंत्र्यांनी पक्षातील इतर इच्छुकांनाही आश्वासन दिले. सध्या संधी न मिळालेल्या नगरसेवकांना पुढील टप्प्यात जबाबदाऱ्या दिल्या जातील, असे सूतोवाच त्यांनी केले. यामुळे अंतर्गत नाराजी टाळण्याचा आणि पक्षातील समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. एकूणच, महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीत कोणताही राजकीय संघर्ष न होता समन्वयातून निर्णय घेण्यात आला. आता केवळ औपचारिक निवड प्रक्रिया पूर्ण होणे आणि अधिकृत घोषणा होणे बाकी असून, त्यानंतर नव्या महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी महापालिकेत जाऊन रितसर अर्ज दाखल केले. यावेळी आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण उपस्थित होते.