जळगाव : शहरातील महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळविल्यानंतर महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया कोणताही वाद न होता शांततेत पार पडली. या संपूर्ण प्रक्रियेत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन तसेच शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेते मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील समन्वय प्रकर्षाने दिसून आला. मात्र, अखेरच्या दिवशी मंत्री महाजन आणि पाटील यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगलीच.
जळगाव महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळासह महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. निवडणुकीतील सुरुवातीच्या काळात मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकडे फारसे लक्ष दिले नसल्याची चर्चा होती. मात्र, अखेरच्या दिवशी त्यांनीच पुढाकार घेत महापौर व उपमहापौर पदावरील दोन्ही उमेदवारांची नावे स्वतः जाहीर केली. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांची शक्यता फोल ठरली. आणि निवड प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाली. अर्थात, या घडामोडीनंतर पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या मिश्किल शैलीत मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला. “आता सर्व काही नीट पार पडलंय, त्यामुळे तुम्ही नाशिककडे जाऊ शकता,” असे सूचक वक्तव्य करत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ निर्माण केला.
जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव महापालिकेत महायुतीने एकसंघपणे सत्ता स्थापन केल्याने आगामी काळात शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महापौर व उपमहापौर निवडीवेळी कोणताही तणाव किंवा संघर्ष न होता प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने महायुतीतील एकजूट अधोरेखित झाली आहे. एकीकडे मंत्री गुलाबराव पाटील यांचा मिश्किल टोला चर्चेचा विषय ठरला असला, तरी दुसरीकडे गिरीश महाजन आणि त्यांच्यातील समन्वयामुळे जळगावच्या राजकारणात स्थैर्याचे संकेत मिळत असल्याचेही राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना, मंत्री गिरीश महाजन यांनी आमच्या दोघांमध्ये कोणतीच ताणाताणी नाही. दोन्ही पक्षांमध्ये तर अजिबातच नाही. जळगावात जिल्हा नियोजन समितीची बैठक असल्याने गुलाबभाऊंनी मला येण्याचा आग्रह केला. मी तर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी जळगावमध्ये येणार पण नव्हतो. माझ्याकडे नाशिकच्या कुंभमेळ्याची एवढी मोठी जबाबदारी आहे, असे सांगितले. त्यावर सगळे साधू तुमची वाट पाहत आहेत. जा लवकर नाही तर गाडी निघून जाईल, असा मिश्किल टिप्पणी मंत्री पाटील यांनी केली.

