जळगाव : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, शुक्रवारी शेवटच्या दिवशी भाजपकडून दोन्ही पदांसाठी प्रत्येकी सहा अर्ज घेण्यात आले. तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून महापौर पदासाठी दोन आणि उपमहापौर पदासाठी दोन उमेदवारी अर्ज घेण्यात आले.
महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४६ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार ) एक जागा आणि अपक्ष नगरसेवकाने शिंदे गटाला दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचे एकूण संख्याबळ आता ७० वर पोहचले आहे. या भक्कम बहुमतामुळे महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून महापौर व उपमहापौर पदासाठी एकही अर्ज घेण्यात आला नव्हता. अंतिम दिवशी भाजपचे शहर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, गटनेते प्रकाश बालाणी, उपगटनेते नितीन बरडे व प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील हे महापालिकेत दाखल झाले.
नगर सचिव सतीश शुक्ला यांच्याकडून गटनेते प्रकाश बालाणी यांनी महापौर पदासाठी चार अर्ज घेतले, तर प्रतोद डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी महापौर पदासाठी दोन अर्ज घेतले. याशिवाय प्रतोद डॉ. पाटील यांनी उपमहापौर पदासाठी दोन, तर नितीन बरडे यांनी चार अर्ज घेतले. अशा प्रकारे भाजपकडून दोन्ही पदांसाठी प्रत्येकी सहा याप्रमाणे एकूण १२ अर्ज घेण्यात आल्याची माहिती मिळाली. अर्जांच्या संख्येवरून भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, भाजपची रणनीती लक्षात घेता शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाच्याही हालचाली वाढल्याचे निदर्शनास आले.
शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक मनोज चौधरी यांनी महापौर पदासाठी दोन आणि उपमहापौर पदासाठी दोन, असे एकूण चार अर्ज घेतले. एकमेव चौधरी अर्ज घेण्यासाठी महापालिकेत आल्याने शिवसेनेचा उपमहापौर पदाचा उमेदवार निश्चित असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. महायुतीत अंतर्गत चर्चा व वरिष्ठ पातळीवरून होणाऱ्या निर्णयानंतर दोन्ही पदासाठी कोणत्या नावांवर शिक्कामोर्तब होणार, हे दोन फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जळगावच्या राजकारणात पुढील दोन दिवस उत्सुकतेचे व निर्णायक ठरणार आहेत. जळगावचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यासाठी भाजपने उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि वैशाली पाटील यांची तीन नावे निश्चित केल्याचे सांगितले जाते.
त्यात शिंदे गटाने महापौर पदासाठी दोन अर्ज घेऊन भाजपला संभ्रमात पाडले. भाजपकडून महापौर पदासाठी चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणत्याच महिला उमेदवाराने प्रत्यक्ष अर्ज घेण्यासाठी महापालिकेत शुक्रवारी हजेरी लावली नाही. महापौर पदासाठी दोन फेब्रुवारीला नामनिर्देशन अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर सहा तारखेला पीठासीन अधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाच्या निवडीची महासभा होणार असून, सभेला सुरुवात झाल्यानंतर अर्ज छाननी होणार आहे. यावेळी १५ मिनिटे अर्ज माघारीसाठी देण्यात येईल. यानंतर शिल्लक अर्जांवर मतदान घेतले जाईल.

