जळगाव : महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंतची वेळ आहे. दोन्ही पदांसाठी नेमके किती आणि कोणाचे अर्ज दाखल होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्षात, दोन्ही पदांसाठी भाजपसह शिवसेना शिंदे गटाकडून आधीच उमेदवार ठरल्याचे बोलले जात आहे. दोन्ही पदांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित असून, फक्त औपचारिक घोषणा होणे तेवढे बाकी आहे.

महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४६ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला २२ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका नगरसेवकासह एका अपक्ष नगरसेवकाने शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने महायुतीचे एकूण संख्याबळ ७० वर पोहोचले आहे. या भक्कम बहुमताच्या जोरावर महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे जाणे जवळपास निश्चित आहे. त्यानुसार, आता महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी सहा अर्ज घेण्यात आले. त्यामुळे भाजपकडन कोणाला संधी दिली जाते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दुसरीकडे, शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही हालचालींना वेग आला असून, महापौर पदासाठी दोन तर उपमहापौर पदासाठी दोन उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. एकूण स्थिती लक्षात घेता महायुतीत आधीच पद वाटपाबाबतचे साधारण चित्र स्पष्ट झाले असले, तरी अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनच घेतला जाणार आहे.

सोमवारी नेमके कोण उमेदवारी अर्ज दाखल करते, त्याकडे पाहून महापौर व उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब होऊ शकणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेतील सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाणार आहे. महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे. भाजपकडून त्यासाठी उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे आणि वैशाली पाटील अशी तीन नावे प्राथमिक स्तरावर निश्चित झाली आहेत.

बेंडाळे, काळे की पाटील ?

मात्र, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने महापौर पदासाठी दोन उमेदवारी अर्ज घेतल्याने भाजपसमोर संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून महापौर पदासाठी चर्चेत असलेल्या तीनही महिला उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराने शुक्रवारी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज घेण्यासाठी महापालिकेत हजेरी लावलेली नाही. त्यामुळे भाजपकडून महापौर पदासाठी नेमके कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

महापौर आणि उपमहापौर पदासाठी सोमवारी नामनिर्देशन अर्ज सादर केले जाणार असून, त्यानंतर सहा फेब्रुवारी रोजी महापालिकेत विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या महासभेचे अध्यक्षस्थान पीठासीन अधिकारी रोहन घुगे भूषविणार आहेत. सभेच्या सुरुवातीलाच सादर झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. अर्ज छाननीनंतर उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यासाठी फक्त १५ मिनिटांचा अवधी देण्यात येईल.

सोमवारी सस्पेन्स संपणार ?

जर एकापेक्षा अधिक अर्ज शिल्लक राहिले, तर नियमांनुसार प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे महापौर पदाची निवड बिनविरोध होते की मतदानाद्वारे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. एकापेक्षा जास्त अर्ज शिल्लक राहिले तर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबवली जाईल. मात्र, दोन्ही पदांसाठी केवळ एक-एकच अर्ज राहिला तर बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांकडून केली जाईल. तत्पूर्वीच, सोमवारी महापौर आणि उपमहापौर पदाचा सस्पेन्स अर्ज दाखल झाल्यानंतर संपण्याची आशा व्यक्त केली जात आहे.