जळगाव : तालुक्यातील म्हसावद आणि परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यापारी तसेच वाहनधारकांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. २०२० मध्ये २५ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे सुमारे ७० टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. वाढलेल्या खर्चामुळे उर्वरित कामासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता निर्माण झाली असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला.
म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची सुधारित किंमत आता ४५ कोटी ८२ लाख रुपये झाली असून मूळ मंजुरीच्या तुलनेत २० कोटी ८२ लाख रुपयांची वाढ झाली आहे. वाढीव खर्चासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाल्याने उर्वरित कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत उड्डाणपुलाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी संबंधित विभागाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
फाटकाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार
म्हसावद परिसरातील वाहतुकीसाठी रेल्वे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ ते मनमाड मार्गावरुन गाड्या ये-जा करताना फाटक बंद होत असल्याने नेरी ते एरंडोल रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे शेतमाल वाहतूक करणारे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर रेल्वे आणि रस्ते वाहतूक स्वतंत्रपणे सुरू राहून वाहतुकीचा खोळंबा कमी होणार आहे.
उर्वरित कामाला मिळणार गती
सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाल्याने आता उर्वरित कामासाठी आवश्यक निधीचा प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे. वाढीव निधीला मान्यता मिळाल्यानंतर बांधकामाला गती देऊन पूल लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. केवळ निधीअभावी प्रकल्प रखडू नये यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आता वाढीव खर्चाचा मार्ग मोकळा झाल्याने उर्वरित कामाला गती देऊन पूल लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत आणण्यासाठी पाठपुरावा सुरू राहील, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर नेरी ते एरंडोल मार्गावरील म्हसावदसह वावडदा परिसरातील गावांची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल. शेतमालाची वाहतूक सुलभ होण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित आणि अखंड प्रवासाचा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
