जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या ५५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी दूध उत्पादकांना ५० पैसे प्रतिलिटर भाव फरक देण्यास सभेने मंजुरी दिली. मागील काळात संघाला आर्थिक अडचणींमुळे फरक देता आला नव्हता. मात्र, संचालक मंडळाच्या काटकसरीच्या आणि नियोजनबद्ध कामकाजामुळे संघ पुन्हा नफ्यात आल्याने यंदा दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम, दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण, ज्येष्ठ संचालक मधुकर राणे, जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा संघाचे संचालक संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ, संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, जिल्ह्यातील सुमारे ४९३ दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांचे सचिव उपस्थित होते.

दूध संघ पुन्हा नफ्यात

सभेत सन २०२५-२६ च्या वार्षिक अहवालासह विविध विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. या आर्थिक वर्षात संघाला १ कोटी ८८ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती सभेत देण्यात आली. विशेष म्हणजे, कोणतेही नवीन कर्ज न घेता संघाने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सांडपाणी हाताळणी प्रकल्पाचे काम पूर्ण केले आहे. संघाच्या स्वनिधीतून दूध उत्पादकांसाठी प्रशिक्षण केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले.तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करून त्याचे अनावरणही करण्यात आले. संघाच्या मालकीच्या वापरात नसलेल्या मोकळ्या जागेचा नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग करण्याच्या विषयालाही सभेने मंजुरी दिली.

ज्येष्ठ सचिवांचा विशेष सन्मान

दूध संस्थांच्या कामकाजात सातत्याने योगदान देणाऱ्या सचिवांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तब्बल ४२ ते ४६ वर्षे सहकारी दूध संस्थांचे सचिव म्हणून सेवा बजावणाऱ्या ज्येष्ठ सचिवांचा प्रथमच संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या दूध उत्पादक संस्था, वैयक्तिक सभासद आणि कर्मचाऱ्यांनाही बक्षिसे, प्रमाणपत्रे, सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चारा नियोजन

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांनी पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दुष्काळाचा परिणाम दूध उत्पादनावर होण्याची शक्यता असल्याने पशुपालकांनी आतापासूनच आवश्यक नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत दूध संकलनात घट होत असल्याचेही सभेत निदर्शनास आणून देण्यात आले. दूध संकलनातील घट होण्यामागील कारणांचा शोध घेऊन त्या दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

‘दूध उत्पादक हा संघाचा केंद्रबिंदू’

मागील काळात संघाला आर्थिक तोटा झाल्याने दूध उत्पादकांना भाव फरक देता आला नव्हता. मात्र, संचालक मंडळाने काटकसरीचे आणि नियोजनबद्ध कामकाज करत संघाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा केली. कोणतेही कर्ज न घेता विकासकामे पूर्ण करून संघाला पुन्हा नफ्यात आणण्यात यश आल्याचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. “जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी हा आपल्या संघाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळावी, यासाठी संघाचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील,” असे चव्हाण यांनी सांगितले.