जळगाव : जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या मालमत्ता, उत्पन्न, कर्जबाजारीपणा, शैक्षणिक पात्रता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या उमेदवारांमध्ये भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत, तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या नावावर सर्वाधिक कर्ज असल्याची नोंद आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे हे कर्जमुक्त उमेदवार म्हणून समोर आले आहेत.

विधान परिषदेच्या रिंगणातील तिन्ही प्रमुख उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून आर्थिक स्थिती, मालमत्तेची व्याप्ती, कर्जाचा भार तसेच गुन्हेगारी आणि सामाजिक पार्श्वभूमीचे विविध पैलू समोर आले आहेत. त्यामुळे मतदानापूर्वी मतदारांना उमेदवारांचे तुलनात्मक मूल्यमापन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पैकी भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण मालमत्ता ४ कोटी ४८ लाख रुपयांची आहे. त्यामुळे ते निवडणुकीतील सर्वाधिक संपन्न उमेदवार ठरले आहेत. बारावी उत्तीर्ण महाजन यांच्याकडे तांदलवाडी आणि हरताळा परिसरात सुमारे २ कोटी १७ लाख रुपयांची शेतजमीन तसेच २ कोटी ३० लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबाकडे ६५० ग्रॅम सोने असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मुलगा प्रतीक महाजन यांच्या नावाने अमेरिकेतील सँटेडर बँकेत सुमारे ३४ लाख रुपयांची ठेव आहे. त्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख २८ हजार रुपयांपर्यंत आहे. त्यांच्या विरोधात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही.

शरद तायडेंकडे चारचाकीही नाही

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांची एकूण मालमत्ता ४६ लाख ५२ हजार रुपयांची आहे. दहावी उत्तीर्ण असलेल्या तायडे यांच्याकडे ३९ लाख ५२ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, धरणगाव तालुक्यात दीड एकर शेती आहे. त्यांच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तायडे आणि त्यांच्या पत्नीचे उत्पन्न आयकर विवरणपत्रात शून्य दाखविण्यात आले आहे. त्यांच्यावर आंदोलनांशी संबंधित तीन राजकीय स्वरूपाचे फौजदारी खटले प्रलंबित आहेत. मात्र, त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आल्याने ते विधान परिषदेच्या निवडणुकीतील कर्जमुक्त उमेदवार म्हणून समोर आले आहेत.

चौधरींच्या नावावर सर्वाधिक कर्ज

तुल्यबळ अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांची एकूण मालमत्ता २ कोटी २९ लाख रुपयांपर्यंत आहे. दहावी नापास अशी त्यांची शैक्षणिक पात्रता आहे. भुसावळ शहरात त्यांच्या मालकीची पाच व्यावसायिक दुकाने आणि सुमारे ७० लाख रुपयांचे निवासी घर आहे. त्यांच्याकडे २० लाख २५ हजार रुपयांची स्कोडा ऑक्टाव्हिया ही आलिशान कारही आहे. मात्र, सर्व उमेदवारांमध्ये सर्वाधिक कर्जबाजारी उमेदवार म्हणून त्यांची नोंद झाली आहे. त्यांच्या नावावर १ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, चौधरी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडेही मतदारांचे लक्ष वेधले जात आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणखी चार गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. जळगाव सत्र न्यायालयाने सुनावलेल्या तीन वर्षांच्या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.