जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना शुक्रवारी नवे वळण मिळाले. महायुतीतील बंडखोरीमुळे चुरशीची शक्यता निर्माण झालेल्या या निवडणुकीत शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवारासह अन्य दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा देणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या जळगाव मतदारसंघात महायुतीसमोर अंतर्गत संघर्षाचे आव्हान निर्माण झाले. महायुतीकडून गेल्या काही दिवसांपासून काळे यांची बंडखोरी थांबविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते. वरिष्ठ नेत्यांकडून संपर्क साधला जात होता, तसेच स्थानिक पातळीवरही समन्वयासाठी बैठका घेतल्या जात होत्या. मात्र, रेश्मा काळे यांनी आपली भूमिका कायम ठेवत निवडणूक लढविण्याची तयारी सुरूच ठेवली होती. या दरम्यान, शुक्रवारीही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या भेटी घेतल्या. मतदारांशी संवाद साधत त्यांनी प्रचारयंत्रणा सक्रिय ठेवली. त्यामुळे त्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येत होते.
याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन जळगाव दौऱ्यावर आले. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. महाजन यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याशिवाय महायुतीचे खासदार, सर्व आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुकीची रणनीती, मतदारांशी संपर्क आणि बंडखोरीचा प्रश्न यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी धक्कादायक दावा केला. शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आपली भूमिका जाहीर करतील आणि निवडणुकीतून माघार घेतील, असे त्यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त महाविकास आघाडीचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारदेखील संपर्कात असून तेही भाजपच्या उमेदवाराला शनिवारी पाठिंबा देतील, असा दावा मंत्री महाजन यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, ठाकरे गटाचे उमेदवार शरद तायडे यांनी त्यांच्या माघारीसंदर्भात गिरीश महाजन यांनी केलेले वक्तव्य लगेच फेटाळून लावल्याने मंत्री महाजन यांचा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीकडून सर्व मतभेद मिटवून एकसंघ शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू असून, पुढील राजकीय घडामोडींवर निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीतील उत्सुकता आणखी वाढली असून, शनिवारी होणाऱ्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
