जळगाव : जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी सोमवारी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी मोठ्या संख्येने महायुतीच्या घटक पक्षांचे विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील किंवा त्यांचे समर्थक कुठेच दिसले नाही. त्याबद्दल पत्रकारांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनाही छेडले.
भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जळगावच्या जागेवरुन बरीच ओढाताण शेवटपर्यंत पाहायला मिळाली. अखेरच्या क्षणी ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर नंदकिशोर महाजन यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीतील एकजूट कायम असल्याचा पुनरुच्चार केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अनुपस्थितीवरून पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता, पाटील मुंबईत महत्त्वाच्या कामानिमित्त गेले असल्याने जळगावात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचा संबंध नाराजीशी जोडणे चुकीचे आहे. कालपर्यंत आम्ही सर्वजण एकत्र बसून निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करत होतो. तासाभरापूर्वी त्यांचे आणि माझे बोलणे झाले. महायुतीमध्ये कोणतीही फूट किंवा मतभेद नाहीत, असे ते म्हणाले.
जागावाटपाच्या चर्चेबाबत अधिक माहिती देताना गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव मतदारसंघाबाबत सुरुवातीपासून भाजप आणि शिंदे गटात विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. शिंदे गटाने जळगावच्या जागेवर दावा केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना जळगावची जागा हवी असेल तर नाशिकची जागा भाजपला द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक मतदारसंघ सोडण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर जळगावची जागा भाजपच्या वाट्याला आली. त्यानुसार उमेदवार देण्याचा निर्णय महायुतीत सामंजस्याने घेण्यात आला, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी शिंदे गटाचे आमदार अमोल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह खासदार स्मिता वाघ आणि अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र काम करत असल्याने महायुती अधिक मजबूत झाल्याचा दावाही मंत्री महाजन यांनी केला. एखादा नेता अनुपस्थित राहिला म्हणून त्यातून नाराजीचा अर्थ काढणे योग्य नाही. विरोधक मुद्दाम अशा अफवा पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. विरोधकांवर टीका करताना त्यांनी महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांचा उल्लेख केला. त्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवारही उभे करता आले नाहीत. आता विधान परिषद निवडणुकीत त्याहूनही वाईट परिस्थिती होईल. जनतेचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रतिनिधींचा विश्वास महायुतीवर आहे.
दरम्यान महायुतीकडून अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त असणे स्वाभाविक आहे. मात्र अधिकृत उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म दिला जाईल. ज्यांना एबी फॉर्म मिळणार नाही, त्यांचे अर्ज वैध राहणार नाहीत. काहीजण अपक्ष म्हणून लढण्याचा प्रयत्न करतील, परंतु वरिष्ठ पातळीवर त्यांची समजूत काढली जाईल. महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते अधिकृत उमेदवाराच्या विजयासाठी एकदिलाने काम करतील. राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. विरोधकांना खातेही उघडता येणार नाही. जळगावमध्येही नंदकिशोर महाजन यांनी ५०० पेक्षा अधिक मते मिळतील, असा ठाम दावा देखील मंत्री महाजन यांनी केला.
