जळगाव – चार वर्षाच्या बालकाचा जीव गेल्यानंतर झोपेतून जागे झालेल्या जळगाव महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी निविदा काढली आहे. परंतु, त्यासाठी कोणीच प्रतिसाद देत नसल्याने यापूर्वी गुन्हा दाखल असलेल्या वादग्रस्त संस्थेला पुन्हा काम देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. अशा स्थितीत, महापालिकेने अनेक वर्षात भटके कुत्रे पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांची भरतीच केली नसल्याचेही उघडकीस आले आहे.

राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये त्या-त्या शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे स्वतःचे पथक असते. या पथकाचा मुख्य उद्देश सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय करणे हा असतो. पथकाकडून पकडलेल्या कुत्र्यांची नियमित नोंदणी केली जाते. त्यांचे निर्बिजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते.

नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दल पथकाकडे तक्रार करू शकतात. पुण्यात तर भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत तक्रार करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आहे. याशिवाय भ्रमणध्वनीवरून व्हॉटस्ॲप संदेश पाठवून तक्रार नोंदविण्याची सोय आहे. अशाच प्रकारे नाशिकमध्येही भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नागरिकांना मदत करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक देण्यात आले आहेत.

जळगावमध्येही कधीकाळी शहरातील भटके कुत्रे पकडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. पथकातील सर्व कर्मचाऱ्यांना कुत्रे पकडण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. सदरचे पथक कार्यरत असेपर्यंत शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या बऱ्यापैकी कमी देखील होती. मात्र, महापालिकेकडून कालांतराने कुत्रे पकडणारे पथक गुंडाळण्यात आले. आणि त्यात सहभागी कर्मचारी अन्यत्र वळवून नव्याने भरती करण्यात आली नाही. खास कुत्रे पकडण्यासाठी तयार केलेली चारचाकी पिंजरा गाडीही नंतर भंगारात काढली गेली.

सद्यःस्थितीत महापालिकेकडे भटके कुत्रे पकडणारी स्वतःची यंत्रणा किंवा नागरिकांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकाची कोणतीच व्यवस्था दिसून येत नाही. स्वाभाविकपणे प्रशासनाला आता भटके कुत्रे पकडण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून, त्यासाठी कोट्यवधी रुपये देखील खर्च करावे लागत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव महापालिकेत १० ते १२ वर्षांपूर्वी कुत्रे पकडणारे स्वतंत्र पथक आणि पिंजरा असलेले वाहन होते. प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च करण्यापेक्षा बाहेरच्या संस्थांकडून कुत्रे पकडण्याचे काम करून घेण्यावर आता भर देत असते. – उदय पाटील (सहायक आयुक्त, आरोग्य विभाग, महापालिका जळगाव).