जळगाव : जिल्ह्यात महिनाभराच्या खंडानंतर सर्वदूर पावसाचे आगमन झाले आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे काही प्रमाणात जीवदान मिळाले असले, तरी काढणीच्या अवस्थेतील केळी बागांसाठी हा पाऊस नुकसानकारक ठरला आहे. विशेषतः चोपडा तालुक्यात अनेक ठिकाणी काढणीवरील केळीच्या बागांमधील झाडे घडांच्या वजनामुळे आणि पावसामुळे आडवी पडली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वर्षभराच्या मेहनतीचे फळ हातात येण्यापूर्वीच ते हिरावले गेल्याने केळी उत्पादक हताश झाले आहेत.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने केळीच्या बागांवरही त्याचा परिणाम झाला होता. पाण्याअभावी केळीच्या झाडांच्या मुळांचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने मुळांची पकड कमकुवत राहिली. त्यामुळे झाडे वरून हिरवीगार आणि उत्पादनक्षम दिसत असली तरी त्यांना जमिनीत पुरेसा आधार मिळत नव्हता. अशा परिस्थितीत पावसाचा मोठा खंड संपल्यानंतर अचानक पाऊस झाल्याने कमकुवत मुळांमुळे अनेक झाडांना घडांचे वजन पेलता आले नाही. परिणामी अनेक झाडे जमिनीवर कोसळली आहेत.
चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान
चोपडा तालुक्यातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काढणीच्या टप्प्यावरील केळीचे पीक जमिनीवर पडल्याने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण खर्चावर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आधीच केळीला बोर्डाच्या भावानुसार अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतानाच आता पावसामुळे काढणीवरील झाडे पडल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे. वर्षभर मेहनत आणि मोठा खर्च करून तयार केलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसताना आता नैसर्गिक संकटामुळे उत्पादनाचेही नुकसान होत असल्याने केळी उत्पादकांमध्ये संतापाची भावना आहे.
पडलेले घड व्यापारी घेणार तरी कसे?
जमिनीवर खाली पडलेले केळीचे परिपक्व तसेच अपरिपक्व घड काही काळानंतर खराब होण्याची शक्यता असल्याने त्यांची विक्री करणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. घडांची गुणवत्ता आणि स्थिती पाहता व्यापारी अशा केळीला बाजारभाव देण्याची शक्यता कमी आहे. अत्यल्प दरातही व्यापारी खरेदी करण्यास तयार नसल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. परिणामी पडलेले घड शेतातच खराब होण्याची किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर येण्याची शक्यता आहे. काढणीच्या टप्प्यावरच पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
पावसाने दिलासा की संकट?
पावसाअभावी खरीप पिके धोक्यात आली असताना पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, काढणीवरील केळी बागांसाठी त्याच पावसाने संकट निर्माण केले आहे. एका बाजूला पावसाचा खंड आणि दुसऱ्या बाजूला अचानक झालेला पाऊस, त्यात बाजारभावातील अनिश्चितता यामुळे केळी उत्पादक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. वर्षभर मेहनत करून तयार केलेले पीक काढणीच्या काही दिवस आधीच वाया जाण्याची वेळ आल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे शासनाने केळी उत्पादकांच्या या नुकसानीची तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंचनामे करून मदतीची मागणी
नुकसानग्रस्त बागांचे तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष नुकसानीचा आढावा घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. काढणीच्या अवस्थेतील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने विशेष मदत जाहीर करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काढणीच्या अवस्थेतील केळीचे झाड पडणे आणि घडांचे नुकसान होणे याची स्वतंत्र नोंद घेऊन पंचनामे करण्याची मागणीही होत आहे. प्रत्यक्ष नुकसानीचा वस्तुनिष्ठ आढावा घेतल्यावरच संबंधित शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळू शकणार आहे.
