जळगाव : संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित संसद रत्न पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही लोकसेवेचा ध्यास न सोडणाऱ्या जळगावच्या खासदार स्मिता उदय वाघ यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. त्यांना गेल्या वर्षीही सदर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

राजकारणाकडे अनेकदा संशय, टीका आणि अविश्वासाच्या नजरेने पाहिले जाते. लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यांच्या कार्यपद्धतीवर चर्चा होते. जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची भावना व्यक्त केली जाते. मात्र, अशा काळात काही लोकप्रतिनिधी आपल्या कार्यातून, संघर्षातून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करतात. जळगावमधील लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार स्मिता वाघ त्यापैकीच एक आहेत.

कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी लोकसेवेचा ध्यास सोडला नाही. उपचार सुरू असताना शरीर थकले होते, असह्य वेदना होत्या, मानसिक ताण होता, तरीही त्यांनी जनतेसाठी काम करण्याची आपली जबाबदारी कधीही दुय्यम मानली नाही. अनेक वेळा रुग्णालयातील उपचार आणि संसदेतील उपस्थिती यामध्ये समतोल साधत त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. एकीकडे आरोग्याशी सुरू असलेली लढाई आणि दुसरीकडे जनतेच्या प्रश्नांसाठी संसदेत सातत्याने आवाज उठवण्याची जबाबदारी, हा संघर्ष अत्यंत कठीण होता; मात्र त्यांच्या इच्छाशक्तीपुढे प्रत्येक अडथळा लहान ठरला.

संसदेत त्यांनी मतदारसंघातील पाणी, शेती, रोजगार, रेल्वे, विमानतळ, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न प्रभावीपणे मांडले. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांचा पाठपुरावा करताना त्यांनी सातत्याने केंद्र सरकारकडे मागण्या लावून धरल्या. लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची त्यांची कार्यशैली नेहमीच लक्षवेधी ठरली.

अनेक वेळा प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी जनतेच्या भेटीगाठी घेतल्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आणि मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांच्या संघर्षाची सर्वाधिक प्रेरणादायी बाब म्हणजे त्यांनी स्वतःच्या वेदनांपेक्षा जनतेच्या समस्यांना अधिक महत्त्व दिले. कर्करोगासारख्या आजारामुळे अनेक जण मानसिकदृष्ट्या खचून जातात; मात्र खासदार वाघ यांनी या परिस्थितीलाच प्रेरणेत रूपांतरित केले. संकटे कितीही मोठी असली तरी धैर्य, सकारात्मकता आणि कर्तव्यनिष्ठा यांच्या जोरावर त्यांवर मात करता येते, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला. त्यामुळे अनेक महिलांसाठी आणि गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

महिलांनी राजकारणात सक्रिय भूमिका घ्यावी, समाजकारणात पुढे यावे आणि संकटांशी खंबीरपणे सामना करावा, याचे जीवंत उदाहरण म्हणून आता त्यांच्याकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. महिलांच्या शिक्षण, स्वावलंबन आणि सुरक्षिततेसाठी त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. त्यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना सार्वजनिक जीवनात पुढे येण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या संसदीय कार्याची दखल घेत त्यांना दुसऱ्यांदा “संसद रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार केवळ संसदेतील उपस्थितीसाठी किंवा भाषणांसाठी नसून जनतेच्या प्रश्नांबाबत असलेल्या संवेदनशीलतेचा, सातत्यपूर्ण कामाचा आणि प्रभावी नेतृत्वाचा गौरव मानला जातो. संसदेत सक्रिय सहभाग, लोकहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा करणे, या सर्व बाबींमुळे त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे.

विशेष म्हणजे गंभीर आजाराशी लढत असतानाही त्यांनी आपली कार्यक्षमता आणि जनसेवा अबाधित ठेवली, ही बाब अधिक प्रेरणादायी ठरते. स्मिता वाघ २००२ ते २०१५ या कालावधीत त्या जळगाव जिल्हा परिषदेत सदस्य होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुराही सांभाळली होती. याशिवाय, २०१७ मध्ये त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या होत्या. २०२४ पासून त्या लोकसभेत जळगावचे प्रतिनिधित्व करत आहेत.