जळगाव : जिल्ह्यात गेल्याच आठवड्यात दोन अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मुक्ताईनगर तालुक्यात सोमवारी सकाळी आयशरच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जागीच ठार झाले. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातात दैव बलवत्तर म्हणून एक वर्षांचा चिमुरडा तेवढा वाचला आहे.
गजानन हिरामण पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील (दोन्ही रा. कोचूर, ता. रावेर, जि.जळगाव), अशी मृतांची नावे आहेत. पाटील दाम्पत्य द्वार दर्शनासाठी दुचाकीवरुन जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळील मरीमाता माता मंदिरालगत सोमवारी सकाळी आठच्या सुमारास समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने त्यांना जोरात धडक दिली. ज्यामुळे पती-पत्नी जागीच ठार झाले. मात्र, त्यांचे एक वर्षाचे बाळ बचावले. अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करुन दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशरच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते.
घर कोसळल्याने महिलेचा मृत्यू
दुसऱ्या घटनेत रावेर तालुक्यातील जिन्सी येथे एका महिलेचा वादळामुळे कौलारू घर कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, संगिता विक्रम बारेला (२५, रा. खरगोन, मध्यप्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे. संगिता बारेला ही रावेर तालुक्यातील विश्राम जिन्सी येथील मनोज पाटील यांच्या शेतातील कौलारू घरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. या दरम्यान, अचानक वारा वादळ सुरू झाले तेव्हा संगिता घरात जेवण करत होती. मात्र, वादळामुळे कौलारू घर अचानक कोसळले. ज्यामुळे महिलेचा भिंतीखाली दबून दुदैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस नाईक कल्पेश आमोदकर हे करीत आहे.
पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू
तिसऱ्या घटनेत स्विमिंग पुलाच्या आउटलेट मध्ये पाच वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जामनेर शहरात घडली. उत्कर्ष गणेश पाटील, असे मृत मुलाचे नाव आहे. उत्कर्ष हा त्याचे वडील गणेश पाटील यांच्यासोबत प्रथमच पोहण्यासाठी जामनेर नगर परिषदेच्या स्विमिंग पूलवर गेला होता. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पूल परिसरात नेहमीप्रमाणेच गर्दी होती. पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर वडिलांनी उत्कर्षला पूलाच्या काठावर उभे करून त्याचे वेगवेगळ्या पोजमध्ये छायाचित्र काढले. मात्र, आनंदाच्या क्षणांचे ते छायाचित्रण काही क्षणांतच दुःखद आठवणीत बदलले. छायाचित्र काढून झाल्यानंतर गणेश पाटील ओले कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूममध्ये गेले. यावेळी उत्कर्ष काही काळ एकटाच स्विमिंग पूल परिसरात उभा होता. मात्र, तो पूलाच्या आउटलेटसाठी तयार करण्यात आलेल्या खोल चेंबरजवळ गेला. या चेंबरवर योग्य झाकण किंवा सुरक्षा उपाय नसल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यात उत्कर्ष बुडाल्याचा अंदाज आहे.
