जळगाव : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदार जनजागृती हेल्पलाइनवर वॉर्डनिहाय मतदान केंद्र शोधण्यासाठीची लिंक अद्ययावत (अपडेट) करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप क्रमांकाच्या माध्यमातून नागरिकांना मतदार यादीतील नाव तपासणे सहज शक्य होणार आहे.
मतदारांनी ९१२५७३५५६५१६ या व्हॉट्सॲप क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवावा. त्यानंतर उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भातील आवश्यक व उपयुक्त माहिती सहजपणे प्राप्त करता येणार आहे. या माध्यमातून वॉर्डनिहाय मतदान केंद्राची माहिती, निवडणूक प्रक्रियेविषयी मार्गदर्शन तसेच मतदारांसाठी आवश्यक सूचना घरी बसल्या मिळणार आहेत. निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि मतदारांना अचूक व वेळेवर माहिती मिळावी, यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. नागरिकांनी या हेल्पलाइनचा वापर करून मतदानासंदर्भातील माहिती जाणून घ्यावी. आणि लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
