जळगाव: महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीने कंबर कसली असून, मोठमोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला रंगत आली आहे. मात्र, या सर्व घडामोडीत जळगाव शहराचा डोळ्यात भरणारा विकास करण्याचे श्रेय ज्यांना जाते, ते माजी मंत्री सुरेश जैन यांचे नाव साधे चर्चेतही नाही. पहिल्यांदा असे घडत असल्याने शहरातील नागरिकांनाही चुकल्यासारखे वाटत आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव शहर कधीकाळी कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. विकासाच्या बाबतीत पिछाडीवर पडलेले हे शहर प्रकाशझोतात आणण्याचे पहिले काम कोणी केले असेल, तर सुरेश जैन यांनी. उत्तर महाराष्ट्रात कुठेच नाही, अशी जळगाव महापालिकेची १७ मजली प्रशासकीय इमारत आज दिमाखात उभी आहे, त्याचेही श्रेय माजी मंत्री जैन यांनाच जाते. विकासावर भर देत असताना दूरदृष्टी आणि मोठे काही तरी करण्याच्या उर्मीतून जळगाव इतर शहरांपेक्षा वेगळे दिसले पाहिजे, याकडे जैन यांनी राजकारणात सक्रीय असेपर्यंत विशेष लक्ष दिले. त्यांच्यामुळेच जळगावमध्ये व्यापारी संकुलांचे जाळे निर्माण होऊन अनेकांना रोजगाराचे साधन मिळाले, हे कोणीच नाकारणार नाही. १९८५ मध्ये जळगाव नगरपालिकेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करणारे सुरेश जैन यांनी जळगावला सिंगापूर करण्याचे स्वप्नही पाहिले होते.
२०१८ मध्ये फासे उलट पडले…
एकेकाळी सुरेश जैन हे शिवसेनेत किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षात असले, तरी जळगाव शहरातील तत्कालीन नगरपालिका आणि नंतरची महापालिका निवडणूक त्यांच्या समर्थकांकडून खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्यात आल्या. या रणनीतीमुळे हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेसारख्या पक्षाच्या उमेदवारांना मुस्लीमबहुल तसेच इतर बिगरहिंदू मतदारसंघांमध्येही चांगले मताधिक्य मिळत असे. जळगावमध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची असली, तरी ती खान्देश विकास आघाडीच्या नावाने ती चालवली जात होती. मात्र, शिवसेना नेतृत्वाने २०१८ च्या जळगाव महापालिका निवडणुकीत धक्कादायक निर्णय घेतला. त्यावेळची निवडणूक खान्देश विकास आघाडीच्या बॅनरखाली न लढता, थेट शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर लढवण्याचा पवित्रा पक्ष श्रेष्ठींकडून घेण्यात आला. परिणामी, बिगरहिंदू मतदारांचा पाठिंबा न मिळाल्याने त्या निवडणुकीत शिवसेनेचे खूपच कमी उमेदवार निवडून आले.
जैन पराभवातून सावरलेच नाहीत…
२०१८ च्या निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तब्बल ५७ जागा जिंकत जळगाव महापालिकेची एकहाती सत्ता आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे सुरेश जैन यांना मोठा राजकीय धक्का बसला. हा पराभव इतका जबरदस्त ठरला की, त्यातून जैन पुन्हा सावरू शकले नाहीत. तेव्हापासूनच त्यांनी जळगावच्या राजकारणातून काढता पाय घेतला. मात्र, जैन यांचे समर्थक नगरसेवक पुढील काळात शिवसेनेच्या ठाकरे गटात स्थिरावले. जैन यांच्यानंतर शिवसेनेत पुढे आलेल्या सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील यांसारख्या तरुण नेतृत्वाने पुढील टप्प्यात भाजपचे काही नगरसेवक आपल्या बाजूने वळवून महापालिकेची सत्ता मिळवली. असे असतानाही सुरेश जैन यांनी महापालिकेच्या राजकारणात पुन्हा कधीही थेट हस्तक्षेप केला नाही. दरम्यान, जैन यांची मनधरणी करून त्यांचे समर्थक असलेल्या ठाकरे गटातील ११ माजी नगरसेवकांना भाजपने नुकतेच आपल्या पक्षात सामील करून घेतले. जैन यांच्या अनुपस्थित यंदा पहिल्यांदा महापालिका निवडणूक पार पडत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत कुठेच त्यांचे अस्तित्व जाणवलेले नाही.
