जळगाव : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला येत्या काही दिवसांत इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असली, तरी त्याआधीच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासह इतर राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पक्षातील वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट, संपर्क वाढविणे तसेच प्रभागातील मतदारांमध्ये आपली उपस्थिती ठळकपणे जाणवावी, यासाठी विविध मार्ग सध्या नगरसेवक पदासाठी इच्छुकांकडून अवलंबले जात आहेत. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेपूर्वीच काही इच्छुक उमेदवारांनी वेगळाच मार्ग अवलंबल्याचे चित्र दिसून येत आहे.

तिकीट अंतिम होण्याआधीच आपल्या प्रभागातील भाविकांना शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी स्वखर्चाने घेऊन जाण्याची लगबग सुरू झाली आहे. बस, भोजन व इतर सोयी सुविधांची व्यवस्था करून सामूहिक दर्शन यात्रांचे आयोजन संबंधितांकडून करण्यात येत आहे. इच्छुकांच्या या उपक्रमामागे धार्मिक श्रद्धेचा आधार घेत मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

संत गजानन महाराजांवरील भाविकांची अढळ श्रद्धा लक्षात घेता या यात्रांमुळे मतदारांचा कृपार्शिवाद मिळेल, अशी अपेक्षा संबंधित इच्छुक उमेदवार बाळगत आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी एका प्रभागातून एकापेक्षा अधिक इच्छुकांकडून अशा यात्रा आयोजित केल्या जात असल्याने स्पर्धाही वाढलेली दिसत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, उमेदवारी निश्चित होण्याआधीच मतदारांपर्यंत पोहोचण्याची ही ‘सॉफ्ट कॅम्पेनिंग’ची सुरुवात मानली जात आहे. निवडणूक रंगात येण्यापूर्वीच आपली ओळख निर्माण करून ठेवणे, सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून जनसंपर्क वाढविणे, हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, यामुळे निवडणुकीत धार्मिकतेचा वापर कितपत योग्य आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

एकूणच जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून, इच्छुक उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपली उपस्थिती प्रभागात ठसवण्यासाठी आणि जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी इच्छुकांकडून वेगवेगळे सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक उपक्रम राबवले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील खुल्या भूखंडांवर नागरिकांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या जुन्या व जीर्ण अवस्थेतील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. मंदिरांची रंगरंगोटी, दुरुस्ती, सभामंडप उभारणी, विद्युत व्यवस्था तसेच स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

धार्मिक श्रद्धेला हात घालून समाजातील विविध घटकांचे समर्थन मिळवण्याची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, हे सर्व प्रयत्न म्हणजे येऊ घातलेल्या निवडणुकीची नांदी असून, प्रत्यक्ष प्रचार सुरू होण्याआधीच मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. हे उपक्रम ‘सामाजिक काम’ या चौकटीत बसवले जात असले, तरी त्यामागे राजकीय उद्देश स्पष्टपणे दिसून येत आहे.

येत्या काही दिवसांत विविध पक्षांकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र होणार आहे. त्यानंतर प्रचारासाठी सभा, संपर्क मोहीम, डिजिटल माध्यमांचा वापर, तसेच नवनवीन कल्पनांचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे. मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आणखी कोणकोणते नवे प्रयोग समोर येतात, याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.